
आशीष बनसोडे । मुंबई
कोरोनाने पुन्हा आपले डोके वर काढल्याने सर्व पातळय़ांवर विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात झाली आहे. कोविडला रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असताना लसीकरणदेखील मोठय़ा प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनानेसुद्धा कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी लसीकरणास सुरुवात केली आहे.
आर्थर रोड कारागृहातील कैद्यांचे लसीकरण सुरू झाले असून गेल्या तीन दिवसांत 39 कैद्यांना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आले, मात्र तरीदेखील कोरोनाने कारागृहात शिरकाव केला होता. तेव्हा अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद व तत्कालीन पोलीस महानिरीक्षक दीपक पांडे यांच्या विशेष प्रयत्नामुळे कारागृहात घुसलेल्या कोरोनाला वेळीच रोखण्यात यश आले होते; परंतु तरी सुद्धा गाफील न राहता कारागृह प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या. राज्यातील सर्वच कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने होण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रशासनाने कमी शिक्षा लागलेल्या कैद्यांना जामिनावर सोडण्याचा निर्णय घेतला, तर आहे त्या कैद्यांमध्ये सोशल डिस्टंस राहावा यासाठी शाळा, महाविद्यालये तसेच अन्य सरकारी जागांचा वापर करून तेथे विलगीकरण कक्ष उभारले. परिणामी कारागृहातून कोरोनाला हद्दपार करण्यास प्रशासनाला मोठे यश आले.
स्थानिक प्रशासनाच्या मदतीने लसीकरण करण्याचे आदेश
गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाने आपले हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वच स्तरांवर पुन्हा विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात झाली आहे. याचाच भाग म्हणून अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी एक आदेश जारी करून राज्यातील सर्व कारागृह अधीक्षकांना कैद्यांना लसीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कारागृहांना आधी न्यायालयाची परवानगी घेऊन मग स्थानिक प्रशासनाची मदत घेऊन कैद्यांना लस देण्यास सुरुवात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे आर्थर रोड कारागृहाने कैद्यांना लस देण्यास सुरुवात केली असल्याचे कारागृह प्रशासनाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
कस्तुरबा रुग्णालयात लसीकरण
पालिकेचे कस्तुरबा रुग्णालय आर्थर रोड कारागृहाच्या बरोबर समोरच्या बाजूला आहे. त्यामुळे आर्थर रोड कारागृह अधीक्षकांनी योग्य बंदोबस्तात कस्तुरबा रुग्णालयात नेऊन सरकारच्या नियमांचे तंतोतंत पालन करीत कैद्यांना लस देण्यास सुरुवात केली. गुरुवारी दहा, शुक्रवारी 15 तर शनिवारी 14 अशाप्रकारे तीन दिवसांत 39 कैद्यांना पहिली लस देण्यात आली. 60 वर्षांवरील तर 45 वर्षांवरील व ज्यांना सहव्याधी आहेत अशा कैद्यांना लसीकरणासाठी प्राधान्य दिले जात आहे.





























































