
वडापाव म्हणजे मुंबईकरांचा जीव की प्राण. इथल्या नाक्यानाक्यांवर वडापावच्या गाडय़ा दिसतात. वडापाव बनवण्याची रेसिपी सारखीच असली तरी प्रत्येक ठिकाणची चव मात्र वेगवेगळी असते. ग्रील वडापाव, शेजवान वडापाव, चीज वडापाव अशा अनेक वडापावच्या व्हरायटी सध्या मिळतात, मात्र ‘फ्लाइंग वडापाव’ची चव कधी तुम्ही चाखलीय? फ्लाइंग वडापाव म्हणजे काय रं भाऊ, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.
फोर्टच्या बोरा बाझार येथील 64 वर्षे जुन्या रघू डोसावाला या खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर हा फ्लाइंड वडा पाहायला मिळतो. आमची मुंबई नावाच्या फूड ब्लॉगरने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तो झपाटय़ाने व्हायरल झाला आहे. वडापाव बनवण्याच्या विव्रेत्याच्या अनोख्या शैलीमुळे याला नेटिझन्सने ‘फ्लाइंग वडा’ असे नाव दिले आहे. हा विक्रेता एका हाताने वडा हवेत उडवतो आणि दुसऱया हाताने त्याचा अचूक झेल घेतो. अवघ्या काही क्षणांमध्ये होणारा हा प्रकार खवय्यांना थक्क करणारा आहे. त्यानंतर तो वडा मसाला पावासोबत कोबी, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, बीट आणि चीजसोबत ग्राहकांना सर्व्ह केला जातो. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.



























































