भंडारदरा धरणाच्या दुरुस्तीसाठी 74 कोटींची तरतूद, केंद्र सरकार, जागतिक बँकेचे सहकार्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकार व जागतिक बँकेच्या साहाय्याने भंडारदरा धरणासाठी 73 कोटी 79 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणात निधी मिळत असल्याने, धरणाचे आरोग्य सुधारण्याचे काम होणार आहे. पहिल्या टप्प्यात 15 कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.

प्रवरा नदीवर 1910-26 या काळात भंडारदरा येथे धरणाचे दगडी बांधकाम झाले. धरणाला 94 वर्षे पूर्ण झाली आहेत. भूकंपामुळे 1969मध्ये धरणास तडे गेल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर 1969-73 या काळात धरणाचे मजबुतीकरण करण्यात आले. 1973 नंतर मात्र धरणावर कोणतेही काम झाले नाही. केंद्रीय जल आयोगामार्फत जागतिक बँकेच्या साहाय्याने धरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्प टप्पा-2 (ड्रीप-2) अंतर्गत महाराष्ट्रातील 30 प्रकल्पांमध्ये भंडारदरा धरणाचा समावेश केला आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने धरण सुरक्षा पुनर्विलोकन समितीची (डीएसआरपी) स्थापना केली.

समितीच्या सदस्यांनी नुकतीच धरणाची पाहणी केली. समितीचे अध्यक्ष बी. सी. कुंजीर यांच्या उपस्थितीत नाशिक येथे बैठक झाली. त्यात धरणाच्या स्थैर्यतेच्या दृष्टीने डायनॅमिक परीक्षण सीडीओ, नाशिक यांच्याकडून करण्याबाबत सूचित केले. या तपासणीनंतर धरणाच्या सुरक्षेसाठी आवश्यक कामे करणे गरजेचे असल्याचे नमूद केले.

धरणाच्या मुख्य दगडी भिंतीतून होणारी गळती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्राधान्याने करण्यात आल्या. केंद्रीय जलअनुसंधान शाळा, पुणे यांच्या क्षेत्रीय पाहणीच्या अहवालाप्रमाणे विविध कामे प्रस्तावित केली आहेत. विश्रामगृह, सांडवा भिंत, आधुनिक भूकंपमापन केंद्र, निळवंडेप्रमाणे नवीन डिझाईन पद्धतीने भंडारदरा प्रकल्पाची कामे होणार असल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले. त्यामुळे जागतिक बँकेमार्फत भंडारदरा धरणास हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

धरण धोकादायक; संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल

– राज्यातील 10 धरणे धोकादायक असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात नमूद केले आहे. त्यात भंडारदरासह घाटघर, जायकवाडीचा धोकादायक जलाशयांमध्ये समावेश असल्याचे अहवालात नमूद केले आहे. राज्यातील इतर धरणांचाही समावेश आहे. मात्र, जागतिक बँकेच्या साहाय्याने लवकरच भंडारदरा धरणाचे काम सुरू होणार असल्याने लाभक्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे. ही धरणे जुनी झाल्याने ती धोकादायक बनली आहेत, असा त्यांचा निष्कर्ष आहे.