
महाराष्ट्राच्या मुलींनी व मुलांनी बुधवारी झालेल्या सकाळच्या सत्रात साखळीतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवीत कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची बाद फेरी गाठली. सूर्यापेठ, तेलंगणा येथे सुरू असलेल्या ‘ह’ गटात महाराष्ट्राच्या मुलींनी अखेरच्या सामन्यात पंजाबला 38-30 असे नमवित या गटातून गटविजेते म्हणून आरामात बाद फेरीत प्रवेश केला, तर मुलांच्या ‘इ’ गटात महाराष्ट्राच्या मुलांनी तामीळनाडूला 38-20 असे पराभूत करीत गटविजेते म्हणून बाद फेरी गाठली. मुलांची सिक्कीमशी, तर मुलींची छत्तीसगडशी उपउपांत्यपूर्व लढत होईल. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींनी विदर्भाला 62-12 असे नमवित सलग दुसऱया विजयाची नोंद केली.



























































