जुहू चौपाटीवरचा सिल्व्हर मॅन, संगीत शिकण्यासाठी लोकांचे मनोरंजन करून जमवतोय फी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘इच्छा असेल तिथे मार्ग नक्कीच निघतो,’ या म्हणीला सार्थ करून दाखवलंय ते जुहू चौपाटीवर ‘सिल्व्हर मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱया 27 वर्षीय चंदन कुमार सिंह या तरुणाने. नोकरीमुळे संगीताची आवड जपायला वेळ मिळत नसल्याने नोकरीला रामराम ठोकून जुहू चौपाटीवर दररोज सायंकाळी ‘सिल्व्हर मॅन’ बनून तो लोकांचे मनोरंजन करतोय. त्यातून जमा झालेल्या पैशांतून चंदन संगीताचे धडे गिरवतोय.

जुहू चौपाटीवर सायंकाळच्या वेळी फेरफटका मारताना चौपाटीच्या एका कोपऱयावर सिल्व्हर रंगाचा पुतळा दिसतो. अनेक पर्यटक या पुतळ्यासोबत सेल्फी घेताना दिसतात. मध्येच तो पुतळा लोकांवर प्रॅंक करून त्यांचे मनोरंजन करतो. गेल्या दोन वर्षांपासून चंदन कुमार सिंह हा तरुण येथे सिल्व्हर मॅन बनून लोकांचे मनोरंजन करतोय. एखाद्या पुतळ्याप्रमाणे त्याच्या शूजपासून ते हॅटपर्यंत आणि संपूर्ण चेहऱयावर सिल्व्हर रंगाचा मेकअप असतो. त्यामुळे ‘सिल्व्हर मॅन’ म्हणून तो चौपाटीवर लोकप्रिय झाला आहे.

चंदन कुमार ते सिल्व्हर मॅन या प्रवासाविषयी तो म्हणाला, मूळचा मी बिहारचा. गायनात करिअर करायचे माझे स्वप्न आहे. त्याच हेतूने 2013 साली मी मुंबईत आलो. सुरुवातीला पाच वर्षे कॅमेरा अटेंडंट म्हणून नोकरी केली, परंतु गायनाची आवड मागे पडत असल्याने मी नोकरी सोडली. परदेशात सार्वजनिक ठिकाणी काही कलाकार विशिष्ट मेकअप करून एखाद्या पुतळाप्रमाणे स्तब्ध उभे राहतात आणि लोकांचे मनोरंजन करतात हे मी युटय़ूब आणि टिकटॉकवर पाहिले होते. त्यातूनच मला सिल्व्हर मॅन होण्याची कल्पना सुचली.

पुढे तो म्हणाला, दिवसभर गायनाचा रियाज करायचा आणि सायंकाळी सिल्व्हर मॅन बनून चौपाटीवर लोकांचे मनोरंजन करायचे असा सध्या माझा दिनक्रम असतो. मी जुहूतील संगीत महाभारती विद्यालयात प्रवेश घेतला आहे. गुडलक म्हणून लोकांकडून जे पैसे जमा होतात त्यातून संगीत क्लासची फी भरतोय.