
मुंबईतील 29 मॉल आणि 250 रुग्णालयांची अग्निसुरक्षा वाऱयावर असल्याचे समोर आले आहे. संबधित आस्थापनांना पालिकेने नोटीस देऊनही कार्यवाही केली जात नसल्याने ग्राहक, रुग्ण आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर सेंटरमध्ये 9 जानेवारी रोजी लागलेल्या भीषण आगीत 10 चिमुकल्यांचा दुर्दैवी बळी गेला होता. तर मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलची आग 60 तास धुमसल्यामुळे मॉल, रुग्णालये आणि नर्सिंग होमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिकेच्या अग्निशमन दलाकडून 11 जानेवारीपासून मुंबईतील नर्सिंग होमची अग्निसुरक्षा तपासणी करण्यात आली. यामध्ये खासगी आणि सरकारी अशा 1324 रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. यातील तब्बल 663 ठिकाणी अग्निशमन यंत्रणेत त्रुटी आढळून आल्या. तर 250 ठिकाणी अग्निसुरक्षा यंत्रणाच नसल्याचे समोर आले. यामध्ये 219 खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. तर 28 पालिका आणि 3 सरकारी रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यक्षम नसल्याचे आढळले आहे. अशा सर्व 250 आस्थापनांना पालिकेने नोटीस दिली असल्याची माहिती पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.
पालिकेकडून अग्निसुरक्षेबाबत जनजागृती
नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे आगीच्या दुर्घटना घडणे, दुर्घटनांत जीवित-वित्तहानी वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये जनजागृतीसाठी प्रशिक्षित 5900 स्वयंसेवकांची टीम तयार करून जनजागृती करण्यात येत आहे. शिवाय पालिका रुग्णालयांमध्ये थरारक मॉकड्रिल घेण्यात येत आहे. आग लागल्याबरोबर त्या ठिकाणाहून पळ न काढता स्वतःला आणि इतरांना कसे वाचवावे यासाठी अग्निशमन दलाकडून रुग्णालये, सोसायटय़ांमध्ये थरारक ‘मॉकड्रिल’ घेण्यात येत आहे.
120 दिवसांची ‘मुदत जिवावर’
अग्निसुरक्षा नसलेल्या आस्थापनांना पालिकेकडून नोटीस देऊन 120 दिवसांत अग्निसुरक्षा यंत्रणा सुरू करण्याचे निर्देश देण्यात येतात. मात्र याकडे बहुतांशी आस्थापनांकडून दुर्लक्ष केला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अग्निसुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी दिलेल्या 120 दिवसांच्या मुदतीत दुर्घटना घडून जीवित-वित्तहानी झाल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱयांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.



























































