
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना 2020 सालचा सरस्वती सन्मान जाहीर झाला आहे. ‘सनातन’ या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. 15 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
के. के. फाऊंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेला सरस्वती सन्मान देशातील प्रतिष्ठत आणि सर्वोच्च साहित्यिक पुरस्कारांपैकी एक आहे. देशभरातील 22 भाषांमध्ये प्रकाशित होणाऱया विविध पुस्तकांमधून एका पुस्तकाची निवड करून हा पुरस्कार दिला जातो. याआधी 1993 साली विजय तेंडुलकर आणि 2002 साली महेश एलपुंचवार यांना हा पुरस्कार मिळालेला आहे.
शरणकुमार लिंबाळे हे प्रामुख्याने दलित आणि सामाजिक विषयांचे लेखक आहेत. त्यांची ‘सनातन’ कादंबरी म्हणजे दलितांच्या संघर्षाचा सामाजिक आणि ऐतिहासिक दस्तावेज आहे. लिंबाळे यांनी 40 पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. अक्करमाशी हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. उद्रेक, उपल्या, ओ, गावकुसाबाहेरील कथा, झुंड, दंगल, दलित आत्मकथा – एक आकलन, दलित पँथर, दलित प्रेम कविता आदी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.



























































