
शिरूर अनंतपाळ पोलीस पथकाने मौजे निटूर येथे रस्त्यावरील लोकांना अडवून हत्याराचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह 12 तासाच्या आत पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार प्रदीप माधव कदम ( 21) हे 30 मार्च रोजी रात्री त्यांच्या मोटरसायकलने लातूर येथून हनुमंतवाडीकडे जात असताना अज्ञात आरोपींनी मौजे हनुमंतवाडीजवळ रस्त्यावर त्यांची मोटरसायकल अडवून शस्त्राचा धाक दाखवत रोख रक्कम 1500 रुपये व 1 विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण 15,500/- रुपयाचा माल चोरला. या तक्रारीवरुन पोलीस ठाणे शिरूर आनंतपाळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
विद्यानंद काळे उपविभागीय पोलिस अधिकारी,चाकूर यांनी पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळ पोलिसांचे वेगवेगळे पथक नेमून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस निरीक्षक शिरूर अनंतपाळ व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार ऋषिकेश बाळू शेवाळे (रा. हडपसर, पुणे) यास मौजे दापका येथून गावकऱ्यांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडे चोरीबाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले की, त्याचे साथीदार राजकुमार नागनाथ पवार (रा. लांबोटा, ता. निलंगा सध्या राहणार पुणे), शुभम गायकवाड (रा. पुणे), सुनील अरविंद मोरे (रा. लांबोटा ता. निलंगा), अशोक तुकाराम शिंदे (रा. पुणे), नागेश गोपाळ निलेवाड (रा. पुणे) आम्ही सर्वजण मिळून चोरी केल्याची कबुली दिली.
त्याची अधिक चौकशी केली असता अशी माहिती मिळाली की, जेव्हा आरोपींना पैशाची गरज असते तेव्हा ते आरोपी सामूहिकरीत्या अशा प्रकारचे गुन्हे करतात. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले धारदार कत्ती, विवो कंपनीचा मोबाइल व पैसे जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपींनी निलंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पण अशाच प्रकारचा गुन्हा केला असून पोलीस ठाणे निलंगा येथे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी इतर ठिकाणीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत काय, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. ही कामगिरी विद्यानंद काळे उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर, कदम पोलीस निरीक्षक , स्वामी पोलीस उपनिरीक्षक ,पोलीस अंमलदार सत्यवान कांबळे, विठ्ठल साठे, लतीफ सौदागर यांनी केली आहे.





























































