
कोरोनाच्या काळात रक्तसाठय़ाचा पुन्हा एकदा तुटवडा भासू लागला आहे. कोरोनामुळे रक्तदान शिबिरांचे कमी झालेले प्रमाण, बंद असलेली कॉलेजेस यामुळे रक्तदानाच्या उपक्रमांवर परिणाम होत आहे. परिणामी राज्यात केवळ 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक असून स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.
रुग्णांना रक्तपुरवठय़ाचे संकट राज्य सरकारपुढे उभे ठाकले आहे. राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर हळूहळू रक्तदानावर परिणाम होऊ लागला. त्यानंतर कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर हे काम जवळजवळ ठप्पच झाले. आता तर केवळ 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक असल्याची माहिती शिंगणे यांनी दिली आहे. राज्यातील शेकडो रुग्णालयांमध्ये नियमितपणे महत्वाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. यासाठी रक्ताची आवश्यकता असते. जर रक्ताचा साठा वाढला नाही, तर अशा रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. म्हणूनच सरकारने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.






























































