कोल्हापुरात तीन कुटुंबांच्या रंगाचा बेरंग; रंगपंचमीनंतर पोहोण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रंगपंचमी साजरी करून पोहण्यासाठी गेलेल्या तीन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने, ऐन सणात तिन्ही कुटुंबाच्या रंगाचा बेरंग झाला आहे. कोल्हापुरातील करवीर आणि पन्हाळा तालुक्यात या घटना घडल्या आहेत. या तिघांनाही पोहता येत नव्हते. यशराज राजू माळी (वय 16, रा. शिंगणापूर, ता. करवीर) या दहावीतील मुलाचा गावातील खाणीत बुडून, तर शिवराज कृष्णा साळोखे (वय 14) आणि शुभम लक्ष्मण पाथरवट (वय 14, दोघे रा. कोडोली, ता. पन्हाळा) या दोघांचा मृत्यू झाला आहे.

माळी कुटुंबीय मूळचे सातारा जिह्यातील आहे. वडिलांच्या निधनानंतर आईने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून, यशराजला लहानाचा मोठा केला होता. सध्या तो दहावीत शिकत होता. आज रंगपंचमीनिमित्त सकाळी मित्रांसोबत रंगपंचमी साजरी करून आंघोळीसाठी गणेशनगर भागातील खाणीत गेला होता.

पोहायला येत नसतानाही त्याने खाणीत उडी मारली. मात्र, कडेला पडून तो गाळात रुतला. कोणाचे लक्ष न गेल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाला.

दुसऱया घटनेत कोडोली येथील शिवराज कृष्णा साळोखे व शुभम लक्ष्मण पाथरवट हे दोघे रंगपंचमी खेळून मित्रांसोबत सकाळी अकराच्या सुमारास वैभवनगर परिसरातील विहिरीत आंघोळीसाठी गेले होते. पोहता येत नसल्याने कपडे विहिरीच्या काठावर काढून ते कठडय़ावर बसले होते. मात्र, अचानक तोल जाऊन ते विहिरीत कोसळले.

दोघे बुडत असल्याचे पाहून शुभमच्या लहान भावाने पळत येऊन गावात ओरडून ही माहिती दिली. ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत विहिरीत शोधमोहीम राबविली. दुपारी तीनच्या सुमारास दोघांचे मृतदेह हाती लागले. शिवराज साळोखे नववीत शिकत होता. त्याचे वडील शेतकरी आहेत. तर, आठवीत शिकणाऱया शुभमची आई शिलाई मशीन चालवून त्याचे संगोपन करीत होती.