टायर फुटून ट्रक समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकला, अपघातात दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गडहिंग्लजवरून गारगोटीकडे चाललेल्या ट्रकचा टायर फुटल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून ट्रक समोरून येणाऱ्या मोटरसायकलला धडकला. या भीषण अपघातात मोटारसायकलवरील दोघांचा मृत्यू झाला.अपघातानंतर ट्रक बाजूच्या शेतात पलटी झाल्याचे चालक आणि क्लिनर जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पांगिरे (ता. भुदरगड) गावाशेजारी पेट्रोलपंपानजीक घडला.

गडहिंग्लजहुन कोरीवकाम केलेली दगडे घेऊन ट्रक गारगोटीकडे जात होता. ट्रक पांगिरे गावाशेजारी पेट्रोल पंपानजीक आला असता अचानक ट्रकचा ड्रायव्हर बाजूचा टायर फुटला. त्यामुळे ट्रक सरळ समोरून येणाऱ्या मोटारसायकलला धडकला. त्यामुळे मोटरसायकलवरील युवराज परीट (रा. ठिकपुर्ली, ता.राधानगरी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर नंदकुमार गायकवाड (रा.माजगाव, ता.राधानगरी) यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघातानंतर ट्रक बाजूच्या शेतात पलटी होऊन सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. ट्रकचालक बाजीराव गायकवाड (रा.गारगोटी) आणि क्लिनर हे जखमी झाले आहेत. याबाबत भुदरगड पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.