म्हसवड-मार्डी रस्त्याची भयानक अवस्था, खड्डय़ांमुळे रस्त्यांची झाली चाळण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माण तालुक्यातील म्हसवड-मार्डी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, वारंवार मागणी करूनही संबंधित विभागाकडून कानाडोळा होत आहे. पावसाने रस्ता जागोजागी उखडला आहे, तर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांची मालिका सुरू असून, या मार्गावरून प्रवास करताना ‘अंगाचा खिळखिळा अन् वाहनांचा खुळखुळा’, अशी अवस्था होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. या मार्गाची त्वरित दुरुस्ती करावी, यासाठी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांची भेट घेतली.

फलटण-शिंगणापूर-म्हसवड या रस्त्याचा भाग असलेला म्हसवड-मार्डी हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ता खचून वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. या रस्त्यावरून कामानिमित्ताने दररोज प्रवास करणाऱ्यांना मणक्याचे विकार सुरू झाले आहेत. या रस्त्यावरून मुंबई, ठाणे, पुणे, फलटण, बारामती, आटपाडी, सांगोला, जत या भागांत जाणाऱया एसटी बस व खासगी वाहनांतून हजारो प्रवासी प्रवास करतात. संपूर्ण महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शंभू महादेव दर्शनासाठी शिखर शिंगणापूरला जाण्यासाठी याच रस्त्यावरून भाविकांना प्रवास करावा लागतो. अत्यंत खराब झालेल्या रस्त्याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागतो आहे.

या रस्त्याच्या साइडपट्टय़ा गेल्या दहा वर्षांत भरल्या नसल्याने डांबरीकरण केलेला भाग व साइडपट्टी यामध्ये अनेक ठिकाणी एक फुटापर्यंतचे अंतर पडले आहे. त्यामुळे दुचाकीसह चारचाकी वाहने घसरून दररोज अपघात होत आहेत. यामुळे प्रवाशांचे हातपाय मोडण्याबरोबरच डोक्याला मार लागल्यामुळे अनेक प्रवासी जायबंदी होत आहेत. वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. अनेकवेळा या रस्त्यावर लहान-मोठे अपघातही झाले आहेत. सध्या दुचाकीचालक रस्त्यावरून वाहने चालवण्यापेक्षा रस्त्याच्या शेजारून वाहने चालवत प्रवास करीत आहेत.

ठेकेदाराने केला पोबारा

म्हसवड-मार्डी रस्त्याची दुरुस्ती व्हावी, यासाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेकवेळा आवाज उठवण्यात आला. त्याचप्रमाणे या भागातील काही राजकीय नेत्यांनीही पाठपुरावा केला. यानंतर कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र, दोनच दिवस काम केल्यानंतर हे काम बंद करून ठेकेदाराने पोबारा केला आहे. याबाबत माण बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, बेजबाबदारपणे उत्तरे देण्यात येत आहेत. याबाबत सातारा येथील अधिकारी म्हसवड येथे फोन करा, असे सांगतात.

शिष्टमंडळाने घेतली पालकमंत्र्यांची भेट

म्हसवड-मार्डी रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, यासाठी शिष्टमंडळाने विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाषराव नरळे, सदस्या सोनाली पोळ, माजी सभापती श्रीराम पाटील, राष्ट्रवादीचे युवराज सूर्यवंशी, पत्रकार अजित काटकर, एल. के. सरतापे यांचा समावेश होता.