जनता वसाहतीत टोळक्यांमध्ये तुफान राडा; वाहनांची तोडफोड, परस्परविरोधी गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जनता वसाहतीचा भाई कोण यावरून दोन गटात रविवारी सायंकाळी सशस्त्र मारामारी झाली. त्यानंतर टोळक्यांनी परिसरात शस्त्र फिरवत वाहनांची तोडफोड करत दहशत माजविली. त्यामुळे जनता वसाहतमधील विठ्ठल मंदिराजवळील रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली होती. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नवनाथ वाडकर, वैभव मोरे, वैभव राऊत, वैभव शिंदे, संग्रमा पाटोळे, शुभम देशमाने, सोमनाथ वाडकर,ऋषिकेश कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर सोपनराव शिवरकर (वय 39, रा. जनता वसाहत) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवरकर हे त्यांचा मित्र संकेत लोंढे याच्यासोबत बोलत थांबले होते. त्याठिकाणी आरोपी गेले. त्यावेळी नवनाथ वाडकर म्हणाला की, माझ्या भागात येऊन भाईगिरी करतो काय, इथला भाई फक्त मीच आहे आहे या दोघांची विकेट टाकून वर पाठवितो, असे म्हणत त्यांना फरपटत शेजारच्या गल्लीत घेऊन गेला. त्याठिकाणी दोघांच्या डोक्यात, पायावर, हातावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. साथीदारांनी लाकडी दांडक्यानी त्यांना मारहाण केली. त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांना आम्हीच जनता वसाहतीचे भाई आहोत, असे म्हणत दहशत निर्माण केली. त्यामुळे नागरिक घाबरून घरात गेले आणि दारे, खिडक्या लावून बसले.

घटनेनंतर एका तासाने संकेत लोंढे व त्याच्या साथीदारांनी गल्ली क्रमांक 26 मध्ये हातात कोयता, रॉड घेऊन दहशत निर्माण केली. तक्रारदार उमेश प्रभाकर स्वामी (वय 48) यांच्या टेम्पोची व इतर वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर उमेश यांच्या पत्नीवर कोयत्याचा वार करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी वार चुकविल्यामुळे जखमी झाल्या नाहीत. याप्रकरणी संकेत लोंढे याच्यासह अक्षय नवले, रोहन जाडे, अदित्य चव्हाण, गणेश जाधव, रोशन उर्फ बाबू उल्हाळकर, हरी शेळकंदे यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण होते.