रत्नागिरीत आजपासून लसीकरण थांबणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ratnagiri-railway-station

जिह्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरण मोहिमेवर विपरित परिणात झाला आहे. सुरुवातीला 104 ठिकाणी सुरू झालेली लसीकरण मोहीम सध्या फक्त 23 ठिकाणी सुरू आहे. सध्या आरोग्य विभागाकडे कोव्हॅक्सिनचे 820 डोस शिल्लक आहेत. उद्यापर्यंत लस उपलब्ध न झाल्यास जिह्यातील लसीकरणाची मोहीम ठप्प होऊ शकते. शिल्लक राहिलेले डोस उद्या संपणार असल्याने शुक्रवारपासून कोविड लसीकरण थांबणार आहे.

जिह्यातील 104 ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली. आतापर्यंत 96,167 जणांना कोरोनाची लस देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून कोरोनावरील लसींचा तुटवडा निर्माण होऊ लागल्याने लसीकरण मोहीम कोलमडली. 104 पैकी सध्या फक्त 23 ठिकाणीच लसीकरण मोहीम सुरू आहे. बुधवारी कोल्हापूरहून लसीचे 1120 डोस उपलब्ध झाल्यामुळे आज पुन्हा लसीकरण मोहीम राबवण्यात आली. सध्या आरोग्य विभागाकडे 820 डोस शिल्लक आहेत. आरोग्य विभागाने लसीची मागणी केली असून उद्यापर्यंत लस उपलब्ध न झाल्यास लसीकरण मोहीम ठप्प होण्याची भीती आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी सांगितले.