
कोरोना चाचण्यांमध्ये, लसीकरणात, सुविधा उभारणीमध्ये आणि दर्जेदार रुग्णसेवा देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य क्रमांक एकवर आहे. महाराष्ट्र एकवटतो तेव्हा तो जिंकतो. कोरोनाविरुद्ध अशाच प्रकारे एकवटून त्याला हरवूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांचे संचालक, तज्ञ डॉक्टर्स यांना केले.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व नामांकित खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी आणि तज्ञांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या वर्षभरापूर्वी कोरोनाशी युद्ध पुकारले ते सुरूच आहे. प्रत्यक्ष युद्ध लढणाऱया सैनिकांप्रमाणे आपण सारे दिवसरात्र रुग्णसेवा करीत आहात. मधल्या काळात रुग्णसंख्या नियंत्रणात येत असताना शिथिलता आली आणि कोरोनाने अक्राळविक्राळ रूप धारण करून हल्ला चढवला आहे. त्यामुळे आताची परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्र एकवटल्यावर तो जिंकतो. ही एकजूट सर्व थरांमध्ये आणतानाच कोरोनाला हरवायचेय आणि यातील तुम्ही महत्त्वाचा दुवा आहात, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासगी रुग्णालयाच्या प्रतिनिधींना सांगितले.
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, धर्मादाय आयुक्त चौरे, टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडीत, डॉ. प्रदीप व्यास, इकबाल सिंह चहल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ब्रीच कॅण्डी रुग्णालयाच्या गीता कोप्पीकर, अश्विनी हॉस्पिटलचे डॉ. राजेंद्र, पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. पी. के. ग्रांट, नागपूरच्या केअर हॉस्पिटलचे डॉ. रवी मनाडे, संभाजीनगरच्या एमजीएम हॉस्पिटलचे डॉ. प्रवीण सूर्यवंशी, ठाण्याचे डॉ. संतोष कदम, डॉ. बिचू, डॉ. गौतम भन्साळी, डॉ. हिमांशू गुप्ता, निर्मल जैस्वाल, डॉ. सुजीत चटर्जी, राजन बोरकर, डॉ. हृषिकेश वैद्य, अविनाश सुपे, डॉ. रवींद्र मोहन, महेश नार्वेकर, संतोष घाग, अमित सोमानी, निर्मल तापरिया, भाटिया रुग्णालय, नानावटी, कमल नयन बजाज, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जम्बो कोविड सेंटर्स खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावे
कोरोनाच्या या कठीण काळात खासगी रुग्णालयांनी आपल्या सुविधा वाढवून रुग्णांना दिलासा द्यावा. शासनाने जम्बो कोविड सेंटर्स उभारले आहेत त्यातील काही खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावेत, असे आवाहन करतानाच या सेंटरमध्ये खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांचा राऊंड झाल्यास उपचारात मदत होईल आणि लोकांच्या मनात या सेंटर्संविषयी असलेली भावना दूर करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रत्येक जिह्यात डॅशबोर्ड झाला पाहिजे – राजेश टोपे
शासनाने खासगी रुग्णालयांतील 80 टक्के खाटा ताब्यात घेतल्या आहेत त्याचप्रमाणे अतिरिक्त बेडची सुविधाही निर्माण करावी. जिल्हा रुग्णालयात खाटांची संख्या वाढवितानाच प्रत्येक जिह्यात डॅशबोर्ड झाला पाहिजे आणि त्या माध्यमातून बेडची उपलब्धता दिसली पाहिजे. खासगी रुग्णालयांनी रेमडेसिवीरचा वापर जपून करा. लक्षणे नसलेल्या रुग्णांना ते देऊ नये. लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या उपचाराचा खर्च वाढणार नाही याची दक्षता खासगी रुग्णालयांनी घ्यावी, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.
सेवानिवृत्त डॉक्टर्स, नर्सना काही काळ पुन्हा सेवेत घ्या – अमित देशमुख
उपचाराच्या सुविधा वाढविताना मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी जे डॉक्टर्स, नर्स निवृत्त झाले आहेत त्यांना पुढील तीन किंवा सहा महिन्यांसाठी सेवेत सामावून घेण्याविषयी प्रयत्न करावेत. त्यामुळे अनुभवी मनुष्यबळ उपलब्ध होईल. छोटय़ा जिह्यांतील खासगी रुग्णालयांचे दरदेखील नियंत्रणात असले पाहिजे. महानगरातील आणि छोटय़ा जिह्यांतील खासगी रुग्णालयातील दर भिन्न असले पाहिजे, असा मुद्दा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मांडला.
हिरे उद्योगाने कार्यशैलीत बदल करावेत मुख्यमंत्र्यांचे आवाहन
कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक निर्बंध आवश्यकच आहेत. पण त्याचबरोबर कामगारांना वेगवेगळ्या शिफ्टमध्ये बोलावून त्याचप्रमाणे घरून काम शक्य असते तिथे परवानगी देऊन आपल्याला आपल्या जीवन आणि कार्यशैलीत मोठे बदल करण्याची गरज आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज डायमंड असोसिएशन पदाधिकाऱयांच्या बैठकीत केले.
ज्वेलरी पार्कच्या प्रस्तावास राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य राहील तसेच डायमंड असोसिएशनने स्टॅम्प डय़ुटी किंवा इतर ज्या मागण्या मांडल्या त्याचाही शासन गांभीर्याने विचार करील अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
या बैठकीस डायमंड असोसिएशनचे पदाधिकारी कोलिन शहा, सुरेंद्र दासानी, अनुप मेहता, मेहुल शहा, रमणिक शहा, राहुल ढोलकिया, किरीट बन्साली, रसेल मेहता, अरुण शहा, सब्यास्याची रे, चिराग लाखी, अरविंद संघवी, दिनेश लखानी, संजय शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
डायमंड इंडस्ट्री सरकारसोबत
डायमंड असोसिएशनच्या पदाधिकाऱयांनी शासनाने उत्पादनक्षेत्रातील कंपन्या सुरू ठेवल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धन्यवाद दिले. राज्य सरकार कोरोना प्रतिबंधाचे काम चांगल्याप्रकारे करत आहे. संपूर्ण डायमंड इंडस्ट्री सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे पदाधिकाऱयांनी सांगितले.
































































