
>> एकनाथ आव्हाड
मुलांच्या भावजीवनाशी नाते सांगणारा, त्यांच्या आनंदाचं इंद्रधनुष्य सहज फुलासम फुलवणारा भारती सोळंके-धुपद यांचा ‘ससोबा भित्रे’ हा नवाकोरा बालकवितासंग्रह मुलांच्या राज्यात दाखल झाला आहे. या संग्रहातून मुलांना ससा, फुलपाखरू, मनीमाऊ, गोगलगाय, आई, आजी, पाऊस, रोपटं आणि त्या रोपटय़ाचं होणारं सुंदर झाड म्हणजेच आपले झाडोबा असे सारेच खेळगडी चक्क भेटायला येतात. ‘ससोबा भित्रे’ या शीर्षक कवितेतील या ओळीच पाहा किती मजेशीर आहेत…
ससोबा भित्रे, काढू लागले चित्रे
ब्रश केला गाजराचा, रंग केला मातीचा
या आणि अशा मजेशीर कवितांसोबतच पर्यावरणपूरक कविताही या पुस्तकात आढळतात. नकळत छानसा संदेश त्या आपल्याला देऊन जातात. कळत-नकळत चांगल्या गोष्टींची सहज जाणीव करून देणाऱया अशा कितीतरी कविता या पुस्तकात आहेत. शाळा मुलांना हवीहवीशी का वाटते? याचे उत्तरही या पुस्तकात अगदी सहजपणे सापडते. तर प्राण्यांची शाळा ही कविता मुलांना प्राण्यांच्या शाळेत चक्क घेऊन जाते.
हरीण कोल्हा ससा आला
सुरुवात केली बाराखडीला
मला वाटतं भारती सोळंके-धुपद या एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका आहेत. जसे त्या मुलांचे मन अचूक जाणतात. तसेच त्यांना मनोरंजनातून ज्ञान कसे द्यावे हेसुद्धा पुरते ठाऊक आहे. म्हणूनच या बालकविता अगदी नकळत मुलांच्या ज्ञानात भर घालतात. त्यांची कविता आणि चित्र हे मित्रासारखे हातात हात घालून भेटायला येतात. त्यांच्या बालकवितांना जसे लय, ताल, नाद याचे भान आहे तसेच या कवितांना मुलांना काय द्यावे आणि काय देऊ नये याची जाणसुद्धा आहे. म्हणूनच या कविता मुलांना मनोमन भावतील, त्यांना आपल्या वाटतील एवढे मात्र नक्की.
ससोबा भित्रे (बालकवितासंग्रह)
कवयित्री : भारती बाळकृष्ण सोळंके
प्रकाशक : गोदा प्रकाशन
पृष्ठे : 32, मूल्य : रुपये 100/-





























































