शिरूर शहरासह तालुक्यात विकएंड लॉक डाऊनला मोठा प्रतिसाद, कडकडीत बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संसर्ग साखळी तुटावी व प्रादुर्भाव वाढू नये या हेतूने शासनाने जाहीर केलेल्या विकएंड लॉक डाऊनला शिरूर शहरासह तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला असून कडकडीत बंद पळाला जात असल्याचे पाहावयास मिळाले.

शिरुर शहरात मुख्य बाजापेठ, भाजीबाजार शहरातील नियमित गजबजलेला असणारा जुना पुणे नगर रोड,कापड बाजार, आडत बाजार, सराफ बाजार, सरदार पेठ, जुने नवे शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती कॉम्पलेक्स, बाजार समिती येथील आडते व्यापारी या भागातील व्यापारी यांची दुकाने पुर्णपणे बंद दिसुन आली. तर मेडीकल, दवाखाने, पेट्रोलपंप, गॅससेवा यासह अत्यावश्यक सेवेतील दुकाने चालु असल्यामुळे या परिसरात तुरळक नागरीक दिसुन येत होते. तर शिरूर नगरपरिषदेच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात येत होते.

शिरूर पोलिसांची शरासह तालुक्यातील विविध भागात गस्त सुरु असल्याने नागरिकही भीतीने बाहेर दिसत नव्हते. शिरुर एस टी बसस्थानकात तुरळक नागरिक दिसत होते.शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना लसीकरण व कोरोना चाचणी करिता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

शिरूर नगरपरिषदेच्या वतीने विकेंड लॉक डाऊन दरम्यान शहरातील वेग वेगळ्या भागात जंतुनाशक फवारणी करण्यात येत असुन नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदार, नागरीक यांच्या वर कारवाई करण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे. या पथकाच्या माध्यमातुन शहरातील सुमारे दहा दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असुन ही दुकाने सिल करण्याबाबत तहसिलदार यांना पत्र दिले आहे. अशी दंडात्मक कारवाई टाळण्याच्या दुष्टीने नियमांचे पालन करून नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

तर तालुक्याच्या ग्रामीण भागात ही नागरिकांनी या वीक एन्ड लॉकडाऊनला मोठाच प्रतिसाद दिला. या दोन दिवसांत नागरिकांनी घरीच थांबणे योग्य समजल्याने कवठे येमाई, जांबुत, टाकळी हाजी, पाबळ, शिक्रापूर, न्हावरे, मांडवगण फराटा, इनामगाव, तळेगाव ढमढेरे व मोठ्या गावातील बाजारपेठा, रस्त्यांवरुन शुकशुकाट दिसत होता.

दवाखाने, मेडिकल व इतर अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. अशाच प्रकारे नागरिकांनी नियमित दक्षता घेत आत्यंतिक गरज असल्यासच घराबाहेर पडावे व कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत आपले, कुटुंबाचे व पारिसरातील नागरिकांचे संसर्गापासून संरक्षण करण्याचे काम केल्यास कोरोनाची ही साखळी तुटण्यास नक्कीच मदत मिळणार आहे.