वाझेचा राइट हॅण्ड काझीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी राष्ट्रीय तपास पथक (एनआयए)ने अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाझुद्दिन काझीला आज अटक केली. कटात सहभागी असणे आणि सीपीयू, डीव्हीआर असे पुरावे नष्ट केल्याचा काझीवर आरोप आहे. न्यायालयाने काझीला 5 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे.

एनआयए गेल्या 20 दिवसांपासून काझीची चौकशी करत आहे. अखेर एनआयएने रविवारी काझीला अटक केली. काझीच्या अटकेमुळे गुन्हे शाखेत खळबळ उडाली आहे. सीआययूमध्ये काझी हा काम करत असल्याने त्याला काही गोष्टी माहीत होत्या. जेव्हा स्फोटक प्रकरण सीआययूकडून एनआयएकडे वर्ग होणार होते त्यानंतर काझीने सीपीयू आणि डीव्हीआर नष्ट केल्याचे एनआयएचे म्हणणे आहे. एनआयएला सचिन वाझे आणि काझीबाबतचे काही पुरावे हाती लागले आहेत. एनआयएला काही कागदपत्रे हवी असून त्यासाठी काझीची कोठडी आवश्यक आहे. तर वाझेकडून काही गोष्टीची माहिती एनआयएला मिळाली आहे. काझीच्या चौकशीत आणखी काही गोष्टींचा खुलासा होईल, असे एनआयएचे म्हणणे आहे. अटकेत असलेल्या काझीने कोणाच्या सांगण्यावरून ते पुरावे कधी आणि कसे नष्ट केले याचा तपास आता एनआयए करणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात एनआयएने जेव्हा स्फोटक प्रकरणाचा तपास हाती घेतला तेव्हा मनसुख हिरेन हा काही माहिती उघड करेल अशी भीती अटक केलेल्या आरोपींना होती असे एनआयएचे म्हणणे आहे. स्फोटक प्रकरणात वाझे हे तपास अधिकारी असून काझी हे सीआययू युनिटमध्ये होते. काझी हा गेल्या 20 दिवसांपासून चौकशीसाठी एनआयए कार्यालयात येत आहेत, असा युक्तिवाद काझीच्या वकिलांनी न्यायालयात केला.

त्या नंबर प्लेटबाबत करणार चौकशी

एनआयएने गेल्या महिन्यात बीकेसीच्या मिठी नदीतून सीपीयू डीव्हीआर आणि नंबर प्लेट बाहेर काढल्या होत्या. त्या नंबर प्लेटबाबत एनआयए काझीची चौकशी करणार आहे. मनसुख हत्या प्रकरणात काझीचा सहभाग कसा होता त्याचा तपास एनआयए करणार आहे. जेव्हा नंबर प्लेट नष्ट केल्या गेल्या तेव्हा काझी तेथे हजर असल्याचा एनआयएचा आरोप आहे.