
श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर चंदन उटीतून श्री’चे अष्टविनायकातील तीर्थक्षेत्र थेऊर येथील श्री चिंतामणी गणेशावतारातील रूप गुढीपाडव्यानिमित्त साकारण्यात आले. श्रीचे चंदन उटीतील रुप लक्षवेधी ठरत आहे. कोरोंना महामारीमुळे भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद असल्याने याचे थेट प्रक्षेपण करत व सोशल मीडियाद्वारे हे रुप भाविकांपर्यत पोहचवण्यात आले.
माऊली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत चैत्र महिन्यात गुढी पाडव्यापासून श्रीचे संजीवन समाधीवर रोज चंदन उटी लेप लावण्यात येतो. त्यास उत्साहात सुरुवात झाली. गुढीपाडव्याला श्रीचे संजीवन समाधीवर आकर्षक वस्त्रालंकारांसह गणेशावतार श्री चिंतामणीचे रूप चंदनउटीतून साकारण्यात आले. यासाठी शिल्पकार अभिजित धोंडफळे व त्यांचे सहकारी यांनी परिश्रम घेतल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. मंदिरात गुढीपाडव्यानिमित्ताने लक्षवेधी फुलांचा वापर करून मुकुंद कुलकर्णी व सहकारी यांनी मंदिर सजविले. यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष तुळशीराम भोसले यांनी विशेष सहकार्य केले.
आळंदी मंदिरात गुढी पाडव्यानिमित्त श्रींना पवमान अभिषेक करण्यात आला. परंपरेने श्रींचे सेवक चोपदार राजाभाऊ रंधवे यांच्याहस्ते गुढी पूजन झाले. वारकरी शिक्षण संस्थेतर्फे 5 वारकऱ्यांच्या उपस्थितीत उल्हास महाराज सूर्यवंशी यांचे कीर्तन झाले. दरम्यान मंदिरात पहाटे घंटानाद, काकडा, श्रीना दुधारती, धुपारती आदी धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले.
आळंदी मंदिरात भाविक, नागरिक, साधक यांना दर्शनास मंदिर बंद असल्याने यावर्षी मंदिरातील कार्यक्रम शासनाचे मार्गदर्शक सूचना व आदेश व नियमांचे पालन करीत मोजक्याच वारकरी, सेवक, पुजारी, व्यवस्थापनातील सेवक, कर्मचारी यांचे उपस्थितीत झाले. नेहमी प्रमाणे मात्र दर्शनास भाविकांची उपस्थिती नव्हती. व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी देवस्थानच्या मंदिरातील प्रथा प्रमाणे पाडव्याचे धार्मिक महत्व ओळखून नियोजन केले.



























































