
बेस्ट प्रशासनाने किमान भाडे पाच रुपये केल्यानंतर बेस्टच्या कंडक्टरचे खिसे नाण्यांनी भरण्यास सुरू झाले असून दिवसाला बेस्टकडे 7 ते 8 लाख रुपयांची सुट्टी नाणी तर महिन्याला 2.40 कोटी रुपयांची सुट्टी नाणी जमत असल्याने इतक्या सुट्टय़ा नाण्यांचे नेमके करायचे काय असा प्रश्न बेस्ट पुढे निर्माण झाला आहे. बेस्टने पगारातून आपल्या कर्मचाऱयांना आतापर्यंत 88 कोटींची नाणी व 193 कोटींच्या कमी मूल्यांच्या नोटा कशातरी संपविल्या आहेत. बेस्टने ही सुट्टी नाणी बँका, टोलनाके, सर्वसामान्य नागरिकांपासून व्यावसायिकांनादेखील वाटली. तरीही बेस्टकडे अजूनही 1.16 कोटींची सुटी नाणी आणि 24 कोटींच्या नोटा शिल्लक आहेत.
बेस्टकडे किमान भाडे पाच रुपये करण्यापूर्वी दैनंदिन सरासरी 2 लाख व मासिक सरासरी 57 लाख रुपयांची सुटी नाणी जमत होती, परंतु त्यानंतर दररोज 7 ते 8 लाख रुपयांची नाणी बेस्टच्या तिजोरीत जमा होत असल्याने बेस्टपुढे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱयांच्या पगारातील काही रक्कम सुटय़ा नाण्यांच्या स्वरूपात तर काही रक्कम छोटय़ा रकमेच्या नोटांच्या स्वरूपात दिली जात आहे.
सुटय़ा नाण्यांसाठी विविध बँकांशी पत्रव्यवहार
बेस्टने सुटी नाणी संकलन करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेबरोबर केलेला करार संपुष्टात आला आहे. तरीही या बँकेने 20 मार्च 2020 पर्यंत वाहतूक विभागाची दैनंदिन रोख रक्कम (सुटय़ा नाण्यांव्यतिरिक्त) संकलित केली होती. त्यानंतर 21 मार्चनंतर या बँकेने आगारांमधून रोख रकमेचा उठाव करण्याचे बंद केले आहे. बेस्टने त्यानंतर नाणी व सर्व मूल्यांच्या नोटा स्वीकारण्यासाठी बँकांच्या बैठका घेतल्या आहेत. त्यानुसार बॅक ऑफ इंडियाने 2 कोटी, एचडीएफसीने 5 कोटी तर आयसीआयसीआय बँकेने 60 लाख रुपये किमतीच्या नोटा व सुटी नाणी स्वीकारली आहेत.


























































