
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी (दि. 17) सकाळी सात ते सायंकाळी सातवाजेपर्यंत मतदान होणार आहे. निवडणूक निर्भय, निःपक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 1 लाख 78 हजार 190 पुरुष मतदार व 1 लाख 62 हजार 694 स्त्री मतदार तसेच इतर 5 असे एकूण 3 लाख 40 हजार 889 मतदार आहेत. मतदारसंघात 524 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यामध्ये 328 मूळ मतदान केंद्रे 196 सहायक मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रांसाठी 524 कंट्रोल युनिट, 1048 बॅलेट युनिट व 524 व्हीव्हीपॅट मशीन असणार आहेत. तसेच 210 कंट्रोल युनिट, 420 बॅलेट युनिट राखीव ठेवण्यात आल्या आहेत. निवडणुकीसाठी 2552 अधिकारी – कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, कर्मचारी व मतदान साहित्य वाहतुकीसाठी 94 एसटी बसेस व तीन जीपची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने मतदान केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर स्वच्छ हात धुण्यासाठी साबण, सॅनिटायझर, फेस मास्क आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच, प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी दिली.
























































