बगाड यात्रा साजरी करणे पंचक्रोशीसाठी ठरतेय धोकादायक, एकट्या बावधनमध्ये 24 तासांत कोरोनाचे 32 नवे रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचे महाभयंकर संकट घोंगावत असताना प्रशासनाने घातलेली बंदी धुडकावून लावत बगाड यात्रा साजरी करण्याचे बावधनकरांनी केलेले आक्रित आता फक्त बावधनकरांसाठीच नव्हे, तर पंचक्रोशीसाठी धोकादायक ठरल्याचे समोर येत आहे. गेल्या 24 तासांत एकट्या बावधनमध्ये 32 जण पॉझिटिव्ह आले असून परिसरात बाधित झालेल्यांची संख्या दीडशेच्या घरात गेली आहे.

मार्च महिना सुरू झाल्यापासून जिह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व यात्रा-जत्रांवर बंदी घातली आहे. मात्र, बावधन येथील बगाड यात्रा गावकऱयांनी प्रशासनाचे बंदी आदेश धुडकावून लावून मोठय़ा प्रमाणात साजरी केली. या यात्रेला हजारोंची उपस्थिती होती. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून शंभरावर लोकांना अटक केली; पण हजारोंची गर्दी जमवून केलेले यात्रेचे आक्रित गावासाठी व पंचक्रोशीसाठी खतरनाक ठरले आहे. यात्रेनंतर दररोजच या परिसरात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळत आहेत. बावधन व परिसरात ‘बगाड’ इफेक्ट ठळकपणे दिसू लागला आहे. बावधनमध्ये मागील 24 तासांत तब्बल 32 जण कोरोनाबाधित निघाले आहेत.