
मुंबई विद्यापीठाच्या वतीने पीएचडी आणि एमफील प्रवेश परीक्षेसाठी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या पेट परीक्षेच्या निकालात गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. परीक्षेवेळी उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा देता न आल्याने अनेकांचे वर्ष वाया गेले असून काहींचे गुण वाढले आहेत तर काहींचे कमी झाले आहेत. या प्रकरणाविषयी परीक्षार्थींनी विद्यापीठाच्या हेल्पलाइनवर संपर्क साधला असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही.
25, 26 व 27 मार्च रोजी मुंबई विद्यापीठाच्या वतीने पेट परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. मात्र परीक्षा सुरू झाल्यापासून परीक्षार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परीक्षेवेळी सिस्टिम हँग झाल्याने काही परीक्षार्थ्यांना परीक्षाच देता आली नाही. सर्व्हर नीट काम करीत नसल्याने प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवून न झाल्याची तक्रार करत अनेक विद्यार्थी विद्यापीठाने पुन्हा परीक्षा घ्यावी अशी मागणी करत आहेत.
पेट परीक्षेत अनेक परीक्षार्थ्यांना पूर्ण प्रश्नपत्रिका सोडविता आलेली नाही तरीही विद्यापीठाने 100 गुणांपैकी निकाल घोषित केला आहे, असा आरोप स्टुडंट लॉ कौन्सिलचे ऍड. सचिन पवार यांनी केला आहे.





















































