‘सन्नाटा’ शांत झाला! किशोर नांदलस्करांचे कोरोनामुळे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन झाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी दुपारी 12.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं असा परिवार आहे.

किशोर नांदलस्कर यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटातही काम केले होते. मराठीत शेजारी शेजारी, शेम टू शेम, बाळाचे बाप ब्रह्मचारी, वाजवा रे वाजवा या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या. तर हिंदीत वास्तव, प्राण जाये पर शान ना जाये तर जिस देस मे गंगा रहता है या चित्रपटात त्यांनी काम केले होते.  जिस देस मे गंगा रहता है या चित्रपटातील त्यांनी साकारलेली ‘सन्नाटा’ची विनोदी भूमिका खूप गाजली होती.

आपल्या विनोदी अभिनयासाठी किशोर नांदलस्कर हे मराठी तसेच हिंदी चित्रपटप्रेमींना चांगलेच परिचित होते. नांदलस्करांचं वास्तव्य बोरिवलीमध्ये होतं. प्रकृती अस्वास्थामुळे ते गेले काही दिवस त्यांच्या मुलाकडे राहायला आले होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना ठाण्यामधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाळकुम परिसरात असलेल्या ग्लोबल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारांना दाद न दिल्याने त्यांची प्राणजोत मालवली. नांदलस्करांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांशिवाय नाटके आणि मालिकांमध्येही काम केले होते.

किशोर नांदलस्कर यांच्या ‘नाना करते प्यार’, ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ अशा अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या. ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ आदी नाटकांमधील भूमिका गाजल्या होत्या. या नाटकांमधील व्यक्तिरेखांद्वारे त्यांनी प्रेक्षकांना खळखळवून हसविले होते.