कदाचित हे शेवटचं गुडमॉर्निंग…, डॉ. मनीषा जाधव यांची मृत्यूशी झुंज अपयशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा जाधव यांचे सोमवारी कोरोनामुळे निधन झाले. त्या 51 वर्षांच्या होत्या. डॉ. मनीषा जाधव यांनी निधनापूर्वी एक निरोपाची पोस्ट लिहिली होती.‘कदाचित हे आपलं अखेरचं गुडमॉर्निंग असेल…’ असं त्यांनी म्हटलं होतं. ही पोस्ट लिहिल्यानंतर 36 तासांत डॉ. मनीषा यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. राज्यात दिवसाला 50 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांना वाचवत आहेत. अशातच डॉ. मनीषा जाधव यांचा मृत्यू चटका लावून गेला आहे. मनीषा यांनी कोरोनावर उपचार सुरू असतानाच रविवारी सकाळी फेसबुकवर पोस्ट लिहिली. ‘कदाचित अखेरचे गुडमॉर्निंग, मी पुन्हा या प्लॅटफॉर्मवर भेटू शकत नाही. सर्वांनी काळजी घ्या, शरीर नश्वर आहे, मात्र आत्मा नाही. आत्मा अमर आहे,’ अशी ही पोस्ट होती.

डॉ. मनीषा यांना गेल्या काही दिवसांपासून ताप येत होता. 12 एप्रिल रोजी त्यांना कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. गेली 20 वर्षे त्यांनी शिवडीतील क्षयरोग रुग्णालयात काम केले होते. मागील वर्षभरापासून कोरोना संक्रमणाच्या संघर्षात डॉ. मनीषा यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते. त्यांच्या पश्चात पती आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांचे पती शताब्दी रुग्णालयात खातेप्रमुख पदावर काम करतात.