स्मृतिगंध – मला उमजलेले श्री.बा.

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सूर्यकांत कुळकर्णी

कुशाग्र बुद्धी, निरीक्षण, आकलन व स्मरणशक्तीमुळे आणि लिहिण्यासाठी हुकमी चपखल शब्दसंपदा लाभलेल्या श्री.बा. जोशींनी एका वेगळय़ा प्रकाराने मराठी साहित्याला समृद्ध केले. कुठल्याही विषयाचे वावडे नसलेले सुमारे बारा-पंधराशे टिपणवजा माहितीपूर्ण लेख म्हणजे चित्रकारांचे रोज नवे कॅनव्हास, नवे रंग, नवे चित्र. अनेक घटना, थोर पुरुषांच्या रोचक कथा श्री.बा. जोशींनी लिहून गंगाजळीचे अमृतकुंभ सर्वांसाठी तुडुंब भरले.

श्रीकृष्ण बापूराव जोशी म्हणजेच श्री.बा. जोशी यांचे बालपण व शिक्षणकाल जरी मुंबई महाराष्ट्रात झाला असला तरी उर्वरित आयुष्य महाराष्ट्राबाहेर म्हणजे कोलकाता यथे 32 वर्षे व निवृत्तीनंतर बडोद्यास सुमारे 32 वर्षे ते होते. मात्र मुंबईतील विद्यार्थी जीवनात त्यांनी आवडनिवड व छंद यांची पायाभरणी अशी भक्कम केली की, त्यानंतरचे साहित्य विश्व उजळून निघाले.
शाळेत शिकत असताना म. वा. धोंड हे त्यांचे मराठीचे शिक्षक होते. तेथून वाचनाची आवड सुरू झाली. पुढे वाचनाचा नाद अनिवार झाला. चरित्रे, आत्मचरित्रे वाचायला आवडू लागली. जुनी कॅलेंडरे, नकाशे जमवू लागले.

नंतर पुढील शिक्षणासाठी श्री. बा. सिद्धार्थ कॉलेजला जाऊ लागले. मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयात अभ्यास व इतर पुस्तकांचा आनंद त्यामुळे घेता आला. तेथे ग्रंथपाल डी. एन. मार्शल यांचे मार्गदर्शन मिळत राहिले. त्याची परिणती म्हणजे पदवी मिळताच त्यांनी ग्रंथालयशास्त्र्ा अभ्यासक्रम करायचे ठरवले. सकाळी सहाला बाहेर पडून 7 ते 2 कचेरीत नोकरी करायचे व तीन वाजता विद्यापीठात वर्गात हजर राहायचे. एका बंगाली क्लासला जायचे. त्यांच्याबरोबर शिकायला दुर्गाबाई भागवत होत्या. ती ओळख वाढत राहिली. श्रीबांचे संपर्क क्षेत्र वाढू लागले. जुन्या पुस्तकांचा शोध घेता घेता अ.का. प्रियोळकरांची ओळख झाली, घरी जाणेयेणे सुरू झाले. त्यांच्याकडील दुर्मिळ गुजराती पुस्तकांची वर्णनात्मक सूची श्रीबांनी तयार करून दिली. श्रीबांनी एक अठ्ठावीस पानी प्रबंध मुंबईच्या संशोधन मंडळात वाचला. तो नंतर ‘नवशक्ती’मध्ये संपादक पु.रा. बेहरे यांनी छापला. श्री. बा. मुंबई ग्रंथसंग्रहालयाचे नेमनिष्ठ वाचक होते. त्यामुळे अनेक मान्यवरांच्या ओळखी होत राहिल्या.

मुंबईत असताना अजून एक उपलब्धी म्हणजे श्रीबांनी हिंदीच्या चार परीक्षा देऊन मिळतील तेवढी हिंदीची पुस्तके वाचून काढली.

मुंबईनगरीची रजा घेऊन श्री. बा. कोलकात्यास 1956 साली पोहोचले व हिंदुस्थानातल्या सर्वात मोठे केंद्रीय सरकारच्या अधीन असलेल्या राष्ट्रीय ग्रंथालयात नोकरीसाठी रुजू झाले. 72 बिघ्याचा परिसर असलेले हे ग्रंथालय पूर्वी व्हाईसरॉयचे निवासस्थान. या गंथालयाच्या समोरच केंद्रीय सरकारी अधिकाऱयांसाठी क्वॉर्टर्स आहेत. त्यातच श्री.बा. जोशी निवृत्ती होईपर्यंत राहिले. त्यावेळेस ग्रंथालयात शंभरएक प्रशिक्षित ग्रंथपाल रुजू झाले असावेत. त्याच परिसरात यादवराव मुळे, चिं. वा. दातार व प्रमिला दातार आणि ना. बा. मराठे हे राहावयास आले.

राष्ट्रीय ग्रंथालयाचा एक स्वतंत्र विभाग म्हणून 1955 मध्ये केंद्रीय संदर्भ ग्रंथालय सुरू झाले. कायद्यानुसार हिंदुस्थानात प्रकाशित झालेले प्रत्येक पुस्तक, नियतकालिके व अन्य प्रकाशन या ग्रंथालयाला पाठवणे बंधनकारक आहे. अशा सर्व पुस्तकांची शास्त्र्ााsक्त पद्धतीने सूची करून ती नियतकालिक स्वरूपात प्रकाशित करणे हे कार्य या विभागीय ग्रंथालयात होते. श्री. बा. जोशी यांच्याकडे मराठी पुस्तकांची व ना. बा. मराठे यांच्याकडे संस्कृतची जबाबदारी होती. श्रीबांच्या समोर ओळख करून घ्यायला दररोज अनेक नवनवी मराठी पुस्तके आपसूक येत होती. श्रीबांना तर रोज साहित्य मेजवानीच वाटत असणार.

कोलकात्यात मराठीपण जपणारी संस्था म्हणजे महाराष्ट्र मंडळ. राष्ट्रीय ग्रंथालयापासून एखाद मैलभर दूर असेल. श्री. बा. सुरुवातीची सात-आठ वर्षे मराठी समवयस्कांबरोबर मिसळून कोलकाता दर्शनात भाग घेत असत. नंतर मराठी समाजात त्यांचा वावर कमी झाला, परंतु मंडळाच्या मासिक साहित्य सभा कार्यक्रमात ते हजेरी लावत असत. त्यांचे अनेक प्रकाशनपूर्व लेख आम्ही ऐकले आहेत. शिवजयंतीला ‘भारतीय भाषांमध्ये शिवाजी दर्शन’ हे चर्चासत्र मी आयोजित केले होते. त्यात श्रीबांच्या समवेत त्यांच्या ग्रंथालय सहकाऱयांनीही भाग घेतला. श्रीबांची रुची मंडळातील अशा कार्यक्रमात जास्त असे. आमच्या लायब्ररी स्टडी सर्कलमध्येही ते फारसे फिरकले नाहीत.

महाराष्ट्रातून कोलकाता भेटीस येणारे अनेक महत्त्वाचे साहित्यिक व इतर प्रतिष्ठत व्यक्ती श्रीबांना भेटून राष्ट्रीय ग्रंथसंपत्तीचा ‘आखों देखा हाल’ पाहत असत. प्र.के. अत्रे श्रीबांच्या घरीही गेले होते. न. र. फाटक, ग. ह. खरे, सेतुमाधवराव पगडी अशा अनेक थोर मंडळींची नावे सांगता येतील. सेतुमाधवरावांनी श्रीबांना पत्रात लिहिले की, ‘‘बंगालची सुभेदारी तुम्हांस दिली आहे. ती नेकीने सांभाळावी व मराठी भाषा नि साहित्य यांची यथाशक्ती भर करावी.’’

कोलकाता वास्तव्यास अनेक बंगभाषी साहित्यिक, कवी, नाटककार यांच्याशी श्रीबांचे स्नेहबंध घट्ट झाले. त्यामुळे त्यांनी काही बंगाली पुस्तके मराठीत व मराठी बंगालीत अनुवादित केली. नाटककार शंभू मित्र यांच्याशी बराच विचारविमर्श केला. सखाराम गणेश देऊसकर यांचे चरित्र श्रीबांनी लिहायला घेतले होते. काही भाग लिहूनही झाला होता, पण ते प्रकाशित झाले नाही.
हे सर्व घडत असताना त्यांनी वयाची 58 वर्षे पूर्ण केली व जुलै 1988 मध्ये ते नोकरीतून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर कोलकाता सोडून ते बडोद्यास स्थायिक झाले. प्रसिद्ध आर्किटेक्ट व लेखक माधव आचवल हे त्यांचे साडूभाई. त्यांच्या शेजारीच बडोद्याला श्री. बा. राहू लागले. आचवल पतीपत्नी गेल्यानंतर श्री. बा. गावाबाहेर कमलानगर येथे राहू लागले. बडोद्याला असताना जागतिक मराठी परिषदेतर्फे निघणाऱया मासिकाचे ते संपादक होते. जसजसे वय वाढत गेले तसतसे ते लोकांपासून जास्त अलिप्त राहू लागले. काहीशी विरक्ती आल्यासारखे झाले. काही वर्षांपूर्वी पत्नीचे देहावसान झाले व ते फारच एकाकी झाले. कुणी भेटायला येऊ नये असे त्यांना वाटे. याबाबतीत मीना प्रभू त्यांना भेटायला गेल्या होत्या. तो वृत्तांत ‘अंतर्नाद’ मासिकात प्रसिद्ध केला आहे. त्यावरून श्रीबांचे स्वभावदर्शन घडते.

कुशाग्र बुद्धी, निरीक्षण, आकलन व स्मरणशक्तीमुळे आणि लिहिण्यासाठी हुकमी चपखल शब्दसंपदा लाभलेल्या श्री.बा. जोशींनी एका वेगळय़ा प्रकाराने मराठी साहित्याला समृद्ध केले. कुठल्याही विषयाचे वावडे नसलेले सुमारे बारा-पंधराशे टिपणवजा माहितीपूर्ण लेख म्हणजे चित्रकारांचे रोज नवे कॅनव्हास, नवे रंग, नवे चित्र. अनेक घटना, थोर पुरुषांच्या रोचक कथा श्री.बा. जोशींनी लिहून गंगाजळीचे अमृतकुंभ सर्वांसाठी तुडुंब भरले.

श्री. बा. जोशी हे जग सोडून गेले. त्यांच्या गंगाजळी खंडांची कुणी नाम व विषयसूची तयार केली तर अनेक संशोधकांचा वेळ वाचून साहित्यातील नवी दालने आपले दरवाजे उघडतील. ही त्यांच्या स्मृतीस श्रद्धांजली.