विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला, 1 कोटींचा माल जप्त; आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा महामार्गावर वाटूळ येथे अवैधरित्या मद्याची वाहतूक करणारा MH-12 LT 7835 हा कंटेनर रत्नागिरी जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा विभाग कार्यालयाचे अधिकारी यांनी पकडला. निरीक्षक मोरे यांनी केलेल्या आदेशानुसार गस्त घालत असताना हा कंटेनर आढळून आला असता यामध्ये हा अवैध मद्य साठा आढळून आला. यामध्ये विदेशी मध्याचे तब्बल 2400 बॉक्स मिळून आले. तसेच कंटेनर सहित सुमारे एक कोटींचा इतका मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

यामध्ये महमद इजाक (रा. केरळ) याला जेरबंद करण्यात आले आहे. या कारवाई मध्ये दुय्यम निरीक्षक अमित पाडळकर आणि संजय भागवत यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. त्यांच्यासोबत संदीप विटेकर, ओंकार कांबळे, मुफडे हे कर्मचारी उपस्थित होते. तसेच जगदीश गोताड विनेश माने, रोहित देसाई, साजिद शहा यांनी मदत केली.

दरम्यान, आतापर्यंतची ही सर्वांत मोठी धडक कारवाई म्हटली जात आहे. या कारवाईचा तपास दुय्यम निरीक्षक अमित पाडळकर हे करत आहेत.