
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
आपल्याला जर विघटनकारी तंत्रज्ञानात प्रगती करून चीनच्या तोडीला पोहोचायचे असेल तर अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करावी लागेल. विघटनकारी तंत्रज्ञानात जगातील प्रगत राष्ट्रे म्हणजे अमेरिका, इस्रायल आणि युरोपचे काही देश यांनी अतिशय वेगाने प्रगती केलेली आहे. हिंदुस्थानचा नंबर एक शत्रू चीनसुद्धा गेल्या काही वर्षांपासून यात वेगाने प्रगती करत आहे आणि आता जगात या तंत्रज्ञानात त्यांना नंबर दोनचे स्थान आहे. गेल्या तीन दशकांमध्ये हिंदुस्थानने नेमके काय केले? या क्षेत्रात हिंदुस्थानची कामगिरी अतिशय निराशाजनक आहे.
विघटनकारी तंत्रज्ञानाच्या (Disruptive technologies) नवीन क्षेत्राच्या उदयामुळे युद्ध लढण्यात आमूलाग्र बदल झाला आहे. उदाहरणार्थ नौदलातील महागडय़ा विमानवाहू नौकांना अतिशय कमी किमतीत असलेले हाइपरसोनिक मिसाईल उद्ध्वस्त करू शकते. हवाई दलातील महागडय़ा फायटर एयर क्राफ्टऐवजी अतिशय कमी किमतीत असलेले ड्रोन जास्त उत्तम काम करू शकतात.
त्सुनामी तंत्रज्ञान विकसित केले जात असून यामुळे सैन्य दलाला युद्ध लढण्यासाठी पुनर्रचना करावी लागेल. विघटनकारी तंत्रज्ञानाच्या परिणामाच्या विविध पैलूंवर उपाययोजना करण्यासाठी महू येथील आर्मी वॉर कॉलेज येथे संरक्षण आणि रणनीती – चर्चासत्र 2021चा भाग म्हणून ‘आपल्या लढाई तत्त्वज्ञानावर विघटनकारी तंत्रज्ञानाचा प्रभाव’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. कोविड 19च्या निर्बंधांमुळे हा कार्यक्रम देशाच्या 54 ठिकाणी वेबिनारद्वारे आयोजित करण्यात आला होता.
चर्चासत्राच्या पॅनेलिस्ट, लष्करी तज्ञ, तंत्रज्ञ, शिक्षणतज्ञ आणि या विषयावरील वक्ते यांनी संबंधित विषयावर चर्चा करून आणि कल्पना मांडून औपचारिक कागदपत्रे आणि सिद्धांत विकसित केले आहेत. स्वायत्त वाहने (Autonomous vehicles), क्लाउड कंप्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), ऑगमेंटेड रियल्टी/व्हर्च्युअल रिअलिटी (एआर/व्हीआर), रोबोटिक्स, बिग डेटा अनॅलिटिक्स, सायबर, स्मॉल सॅटेलाईट, 5-जी/6-जी, क्वांटम पंप्युटिंग आणि सायबर वॉरफेअरसारख्या विघटनकारी तंत्रज्ञानावर चर्चा झाली. हे चर्चासत्र हिंदुस्थानी लष्करासाठी राष्ट्रीय महत्त्व असलेल्या सैद्धांतिक आणि सामरिक मुद्दय़ांकडे लक्ष वेधणारे होते आणि यामुळे जटिल संकल्पना जाणून घेता आल्या.
विघटनकारी तंत्रज्ञानाचे अनेक चांगले फायदे आहेत. यामुळे आपण आपल्या सामान्य जनतेच्या आशा-आकांक्षा जास्त वेगाने पूर्ण करू शकतो. चीनसारखे देश मात्र या तंत्रज्ञानाचा वापर दुष्कृत्ये करण्यासाठी आणि लढाई करण्यासाठी करतात. चीन या तंत्रज्ञानाचा कसा गैरवापर करत आहे हा एक वेगळाच विषय होईल. या लेखात आपण आपले लक्ष विघटनकारी तंत्रज्ञानाचा वापर करून देशाला अजून कसे जास्त सुरक्षित करता येईल यावर केंद्रित करू.
आपल्याला जर विघटनकारी तंत्रज्ञानात प्रगती करून चीनच्या तोडीला पोहोचायचे असेल तर अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करावी लागेल. विघटनकारी तंत्रज्ञानात जगातील प्रगत राष्ट्रे म्हणजे अमेरिका, इस्राईल आणि युरोपचे काही देश यांनी अतिशय वेगाने प्रगती केलेली आहे. हिंदुस्थानचा नंबर एक शत्रू चीनसुद्धा गेल्या काही वर्षांपासून यात वेगाने प्रगती करत आहे आणि आता जगात या तंत्रज्ञानात त्यांना नंबर दोनचे स्थान आहे. गेल्या तीन दशकांमध्ये हिंदुस्थानने नेमके काय केले? या क्षेत्रात हिंदुस्थानची कामगिरी अतिशय निराशाजनक आहे. ज्या थोडय़ा संघटना या विषयावर काम करत आहेत त्यांचा काम करण्याचा वेग हा बैलगाडीचा आहे.
गेल्या तीस वर्षांमध्ये अनेक सरकारी रिपोर्ट तयार करण्यात आले. 2001चा ग्रुप ऑफ मिनिस्टर रिपोर्ट, 2005मध्ये केळकर समिती रिपोर्ट, 2007मध्ये सिसोदिया कमिटी रिपोर्ट, 2008मध्ये रामाराव कमिटी रिपोर्ट… या सगळ्य़ांनी अनेक सूचना केल्या; परंतु त्यावर फारशी अंमलबजावणी झाली नाही.
सध्याची परिस्थिती
या विषयावर जास्त वेगाने काम करण्याकरता अनेक योजना बनवण्यात आल्या आहेत. यात चार तंत्रज्ञानावर खास लक्ष देण्यात आलेले आहे. पहिले तंत्रज्ञान आहे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स. दुसरे तंत्रज्ञान आहे हाइपर सोनिक शस्त्रे. तिसरे तंत्रज्ञान आहे क्वांटम टेक्नॉलॉजी… यामध्ये हिंदुस्थानी सैन्य, जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्था जशा आईआयटी, संशोधन करणारे शास्त्र्ाज्ञ यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि याला आता मिशन मोडने पुढे नेण्यात येत आहे.
यावर अंमलबजावणी चांगली झाली तर येणाऱया काळात नेमका काय परिणाम होऊ शकतो? याआधी आपण बैलगाडीच्या वेगाने पुढे जात होतो आणि जग रॉकेट टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या अनेक दशके पुढे गेले होते. परंतु आपण जर आपल्याकडे असलेल्या क्षमतेचा चांगला वापर केला तर याआधी आपल्याला आलेले अपयश भरून काढण्यात नक्कीच एक मोठी संधी मिळेल.
सायबर तंत्रज्ञानात शत्रूवर आक्रमक कारवाई करण्याकरिता तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून सर्व्हेलन्स म्हणजे शत्रूवर 24 तास जमिनीच्या वरती, आकाशात लक्ष ठेवणे शक्य होईल. त्यांच्या कुठल्याही सैनिकी हालचालीचे विश्लेषण करून देशाला किती धोका निर्माण होतो आहे हे शोधता येईल. आँटी सॅटॅलाईट शस्त्रे तयार केली जातील. फाइव्ह-जी तंत्रज्ञानाचा वापर करून आपण कुठल्याही देशाला तोडीस तोड असे उत्तर देऊ शकू. इलेक्ट्रॉनिक वोर फेअरमध्ये शत्रूच्या तंत्रज्ञानावर प्रतिहल्ले करण्याची क्षमता निर्माण होईल. ऑटोनॉमस व्हीकल म्हणजे ड्रोन्सचा वापर करून स्वार्म ड्रोन्स म्हणजे 75 ते 100 ड्रोन्स एकाच वेळेला शत्रूवरती हल्ला करण्याची क्षमता प्राप्त होईल. क्वांटम टेक्नॉलॉजीचा वापर करून शत्रूला आपल्या फायर वोलच्या(रक्षात्मक भिंत) आत प्रवेश करणे अतिशय कठीण होईल. डायरेक्ट एनर्जी वेपन विकसित करून आपण चीनला मेसेज देऊ शकतो की, तुम्ही जर अशा तंत्रज्ञानाचा वापर केला तर त्याला प्रत्युत्तर देण्याची आमचीपण क्षमता आहे.
नीती आयोगाने तयार केलेल्या एका रिपोर्टप्रमाणे या विषयात जर आपल्याला वेगाने प्रगती करायची असेल तर अनेक बाबींकडे अनेक पैलूंकडे लक्ष ठेवावे लागेल यामध्ये देशाचा ‘इनोव्हेटिव्ह इंडेक्स’ हा वाढवावा लागेल. देशाचा ‘आर & डी इंडेक्स’ वाढवावा लागेल आणि नवीन तंत्रज्ञान प्रयोगशाळेतून सैन्यात येण्याचा वेग वाढवावा लागेल. कारण अनेक वेळा तंत्रज्ञान हे प्रयोगशाळेत विकसित केले जाते, मात्र लढणाऱया सैनिकांकडे पोहोचण्याकरता प्रचंड वेळ लागतो.




























































