
>> संतोष आंधळे
कोरोनाच्या या हाहाकारात काही जण शासन आणि प्रशासन कसे कोरोनाचा फैलाव थांबण्यात कमी पडले असल्याच्या टीका करत आहेत. मात्र काही नागरिक असे आहे की कोरोनाविरोधातील लढाई ही फक्त प्रशासनाविरोधात नसून सामान्य नागरिकांनीसुद्धा या लढाईत सक्रिय सहभाग घेऊन जमेल ती मदत आरोग्य यंत्रणेला करीत आहे. ज्यामुळे काही गंभीर रुग्णांचा जीव वाचविण्यास मदत होत आहे. त्यापैकीच अंबरनाथ येथील 65 वर्षीय निवृत्त मोहन कुलकर्णी यांनी आपल्या पेन्शनच्या पैशातून अंबरनाथ नगरपालिकेच्या रुग्णालयाला साडेसहा लाखांची मदत करून व्हेंटिलेटर घेण्यास मदत केली आहे.
शासनाने मदत केली पाहिजे ही ओरड सगळे करतात. अनेक वेळा सल्ला देण्याचे कामही करत असतात, मात्र प्रत्यक्षात मदत करण्याच्या कामात मात्र ते पुढे येत नाही. या अशा आरोग्याच्या आणीबाणीच्या काळात अंबरनाथ येथे शिव बसव नगर येथे राहणारे कुलकर्णी यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ रुग्णालयाला मदत केली आहे. त्यांच्या पत्नीचे ऑक्टोबर 2019 मध्ये कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. कुलकर्णी एका खासगी पंपनीतून निवृत्त झाले असून त्याची जी पुंजी त्यांनी पुढचे आयुष्य जगण्यासाठी ठेवली होती. त्यातून आणि पेन्शनच्या पैशातून त्यांनी ही मदत केली आहे. त्यांनी याकरिता अडीच लाख रुपयांचे कर्जसुद्धा काढले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना कुलकर्णी सांगतात की, ‘अंबरनाथ येथे नगरसेवक पुरुषोत्तम उगले हे माझे मित्र. त्यांच्याशी गप्पा मारताना मी अॅम्ब्युलन्स देण्याची इच्छा व्यक्त केली होती. माझ्या पत्नीच्या निधनानंतर तिच्या स्मरणार्थ काहीतरी समाजासाठी करायची इच्छा होती. त्यावेळी मी चार लाख रुपयांची मदत करणार होतो. त्यांनी तो प्रस्ताव नगरपालिकेच्या सीईओना दिला. त्यानंतर त्यांना सीईओनी सध्या अॅम्ब्युलन्स आहेत, मात्र व्हेंटिलेटरची गरज असे कळवले. त्यानुसार मला माहिती दिल्यानंतर मी व्हेंटिलेटर देण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता थोडे पैसे मी कर्ज घेतले. ते मी माझ्या असलेल्या पुंजीतून फेडणार आहे.’
या कोरोनाच्या विषाणूमुळे रुग्णसंख्या अचानक वाढल्याने रुग्णालय प्रशासनाच्या सोयी अपुऱया पडू लागल्या आहेत. त्यामुळे सर्वच स्तरातून मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. अशा वेळी रुग्णालयांना गरजेच्या असणाऱया वस्तू मिळाल्यामुळे याचा थेट फायदा गरजू आणि गरीब रुग्णांना होणार आहे.
या कठीण काळात आपण प्रशासनाला मदत केली पाहिजे. मी साडेसहा लाख रुपये व्हेंटिलेटर बनविणाऱया कंपनीला दिले. त्यांनी 28 एप्रिल रोजी ते व्हेंटिलेटर रुग्णालयाला दिले. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने मला बोलावले होते. सध्या या अशा उपकरणाची रुग्णालयांना नितांत गरज आहे. या व्हेंटिलेटरमुळे एखाद्या रुग्णाचे प्राण वाचतील यातच माझे समाधान आहे.





























































