1st May Workers Day – दुसरे महायुद्ध आणि कामगार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विज्ञानाच्या जोरावर नवनवीन शोध लागत गेले आणि युद्धाच्या समरांगणाची व्याप्ती फार वाढली. पूर्वी युद्ध फक्त एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आणि काळापर्यंतच लढले जात होते. परंतु आता युद्ध हे तुमच्या–आमच्या उंबरठय़ावर येऊन ठेपले आहे. Push Button War Theory च्या या युगात आता मॉस्कोत बसलेला माणूस हजारो योजने दूर असलेल्या काबूल–कंदाहारलासुद्धा नेस्तनाबूत करण्याचे – मनसुबे रचत आहे. हा नव्या युद्धतंत्राच्या परिभाषेतील फरक असून सैनिकांप्रमाणेच कामगार या युद्धाच्या अंतिम निर्णयावर परिणाम करणाऱया मानवास म्हणूनच आज महत्त्व प्राप्त झाले आहे. कामगारांची गुणवत्ता व प्रचंड उत्पादन क्षमता बळावली तर युद्धाचे पारडे बदलण्यास वेळ लागत नाही. हा दोन्ही महायुद्धांतला अनुभव ताजा आहे.

सामान्यतः कामगार म्हटले म्हणजे संप, बेशिस्त वर्तन करणारा व सामूहिक दबावाने प्रतिकार करणारा, कर्जामध्ये बुडून जाणारा, अकाली वृद्ध होणारा प्राणी असा गैरसमज समाजाने करून घेतला आहे, परंतु तो सर्वार्थाने बरोबर नसून कामगारांशी जर योग्य त्या आदराने व त्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या कलाने वागले तर ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी’ या संत वचनाप्रमाणे कामगार त्यांचे सर्वस्व पणाला लावून उत्पादकता वाढवत नेतात. श्रमाशी निगडित उत्पादकता व उत्पादकतेशी निगडित वेतनमान हा बहुश्रुत करारनामा बोल्शेव्हिक क्रांतीनंतर टप्प्या-टप्प्याने प्रगत होत गेला. परंतु याच्या मुळाशीसुद्धा कामगारांनी विशेषतः रशियन क्रॉम्रेडस्नी दुसऱया महायुद्धात जो दिवसरात्र घाम गाळून ‘दो पंच एक लंच’ची तमा न बाळगता प्रचंड उत्पादन केले व सैन्याच्या मागणीनुसार युद्धसामुग्री साधनांचा ओघ चालू ठेवला, त्याचेच फलित आहे.

हिटलरचा झंझावात

दुसऱया महायुद्धात स्टॅलिनने सर्वांना कोडय़ात टाकणारा व आश्चर्यचकित करून सोडणारा हिटलरबरोबर मैत्रीचा जो रूसो-जर्मन करार केला होता, त्यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे औद्योगिक विकास. जोसफ स्टॅलिन हा फार धूर्त गृहस्थ होता. जर्मनी आज ना उद्या रशियावर हल्ला करणार हे तो जाणून होता, परंतु तत्पूर्वी कुशल कामगार तयार करून उत्पादनपातळी, गतिशीलता वाढविण्यासाठी युद्ध जेवढे लांबवता येईल तेवढे बरे या न्यायाने त्यांनी हा करार करून पोलंडचाच भूप्रदेश खिशात टाकला होता. हिटलरच्या झंझावाताला तोंड देण्यासाठी स्टॅलिनने रशियन  कामगारांसमोर एक राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा चार्टर ऑफ डिमांड मांडला होता. मॉस्को व लेनीनग्राडमधील कामगारांनी सैनिकांच्या मदतीसाठी स्वतःची पथके उभारावीत व देशभर संपविरोधी कायदा अमलात आणावा. ही पॉलिटी ब्युरोसमोरची त्याची मागणी मान्य होऊन कामगारांनी युद्धात अंतिम विजय मिळेपर्यंत अर्धपोटी व अर्धपगारी काम केले. त्या काळात युद्धसामुग्री व अन्नाची चोरी करणाऱयांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात येईल. असेही त्याने स्पष्टपणे जाहीर करून त्यावर हुकमी उपाययोजना केली होती.

याबाबत कामगार वस्तीत घडलेली सत्यकथा कॉस्टनस्टाईल सिमोनोब या रशियन लेखकाने आपल्या ‘दि लिव्हिंग अॅण्ड दि डेड’ या कादंबरीत रंगवली आहे. ती राष्ट्रप्रेमी कामगारांच्या स्वभावावर प्रकाश टाकणारी आहे. ब्रेडने भरलेला एक ट्रक रस्त्याने जात असताना शत्रूचा एक गोळा आला व त्याने ड्रायव्हरचा बळी घेतला. त्यामुळे ट्रक उलटा होऊन आतील सर्व पाव रस्त्यावर इतस्ततः पसरला. शेकडो कामगार तेथे जमा झाले, पण एकानेही आपला हात त्या पावाला तर लावला नाहीच, उलट या पावाभोवती संरक्षणात्मक साखळी धरून दुसरा ट्रक येऊन त्यात पाव भरून युद्ध आघाडीवर तो पावाचा ट्रक सुखरूपपणे पोहोचवला. त्या सर्व कामगारांची पोटे सपाटी गली होती व पावांकडे ते आशाळभूत नजरेने पाहत होते, हे मात्र खरे, दुसऱया महायुद्धात उरळ व सैबेरीयातील कामगारांनी अक्षरशः काळाशी शर्यत सुरू केली. यंत्रे उघडय़ावर पडून ती गंजतील व परिणामी कुचकामी ठरतील. म्हणून कामगार आपले गणवेश त्यावर पांघरून झोपत असत. हा भाग सर्वस्वी जंगली होता व अन्नाची टंचाई, कडाक्याची थंडी व वाहनांची वानवा असे असतानाही हे कामगार राष्ट्र जिवंत ठेवण्यासाठी 15/16 तास काम करत होते. दिवसा कारखान्यात राबते  रात्री खंदकात बसून शत्रूला प्रत्युत्तर देणे या दोन आघाडय़ांवर कामगार लढत होता व प्रत्येक घराला जणू युद्धकालीन बराकीचे स्वरूप आले होते.

या कारखान्यांना लागणारी वीज, पाणी, इंधनसुद्धा कामगारांनी अहोरात्र खपून उपलब्ध केले. हे करत असताना अनेक कामगार भूकेने व थंडीने मृत्युमुखी पडले. अनेकांना हिमघातामुळे (फ्रास्ट बोईट) कायमचे हातपाय गमवावे लागले, परंतु हा त्याग स्वयंस्फूर्त होता. संन्याशाच्या लग्नाला जसे शेंडीपासून तयारी तसे हे कार्य होते आणि तेही नाझी सेनेचा प्रचंड झंझावात, बॉम्बवर्षाव चालू असताना प्राणाची बाजी लावून करावे लागत होते हे महत्त्वाचे. या काळात रशियन कामगारांनी जुलै ते नोव्हेंबर 1941 पर्यंत 1523 छोटय़ा-मोठय़ा कारखान्यांचे स्थलांतर केले. 226 व्होल्गा खोऱयात 667 उरळसारख्या जंगलात. 244 पश्चिम सायबेरियात, 78 पूर्व सायबेरियात, 308 कझाकिस्तानात आणि हे स्थलांतर करण्यास 15 लक्ष वाघिणी (वॅगन्स) लागल्या होत्या.

याबाबत अलेक्झांडर बर्थ या लेखकाने लिहून ठेवले आहे की, रशियात युद्धाच्या प्रारंभी करण्यात आलेले कारखान्यांचे स्थलांतर व कामगारांनी उत्पादनक्षमतेचे घालून दिलेले उदाहरण हा मानवी परिश्रम व संघटनाकौशल्य यांनी घडवून आणलेला एक चमत्कारच मानावा लागेल.

हिंदुस्थानी कामगार-स्वातंत्र्योतर काळातील सर्व हिंदुस्थानी युद्धाच्या काळात दारूगोळा सामग्री (Ammunition) पुरवठा करणारे हात व शस्त्रसंशोधन (DRDO) विभागातले कामगार दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करत त्यांनी अम्युनेशन फॅक्टरी हेच आपले घर केले होते. वायुदलाच्या साधन सामुग्रीच्या अथक प्रयत्नांमुळेच हवाई  दलाची एअर क्राफ्टस दिवसात 200-200 उड्डाणे करू शकली. गोदीत उभी असलेली युद्ध नौका मोहिमेवर जावी म्हणून झटणारे हात मी स्वतः पाहिले आहेत. विक्रांतसारख्या अवाढव्य विमानवाहू नौकेला सीमोईबा बनवणे हे येडय़ा गबाळय़ाचे काम नव्हे.

रशियन कामगारांप्रमाणेच अमेरिकन कामगारही युद्धकाळात जिवाची बाजी लावून उत्पादकतेसाठी घाम गाळत होता. 1941 साली अमेरिका युद्धात ओढली गेली. तेव्हा तिने ग्राहकोपयोगी मालाच्या उत्पादनात उच्चांक गाठला होता. मोटारीचे उत्पादन व विक्रीने सर्व विक्रम मोडीत काढून उच्चांक गाठला होता. ही भरभराट एक इष्टापत्तीच होती. हे सर्व न्यू डील औद्योगिक धोरणामुळे शक्य झाले. आपले नफे घटवायला मालकवर्ग तयार नव्हता. पर्ह्डसारख्या बडय़ा कारखानदारांची वृत्ती फारच चमत्कारिक होती.

(लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत.)