
देशात ऑक्सिजनच्या तुटवडय़ामुळे रुग्णालयांचाही जीव गुदमरला आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळणे म्हणजे सध्या तरी दिव्यच. देशातील संशोधक रात्रंदिवस संशोधन करून यावर उपाय शोधत आहेत. आयआयटीच्या संशोधकांनी तर घरच्या घरी ऑक्सिजन किटची निर्मिती करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. किमान एका रुग्णाला तरी पुरेसा होईल इतका ऑक्सिजन त्याद्वारे निर्माण करता येणार आहे.
मद्रास आयआयटीतील केमिस्ट्री विभागातील प्राध्यापक टी. प्रदीप यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी हा प्रयोग केला आहे. त्यांनी बनवलेले ऑक्सिजन किट घरच्या घरीही उपलब्ध साधनांचा वापर करून बनवता येऊ शकते असे आहे. ‘प्रयोगशाळेत उपलब्ध साहित्य आणि रसायनांचा वापर करून ऑक्सिजनची निर्मिती सहज करता येते. त्याचे अनेक व्हिडीओही इंटरनेटवर उपलब्ध आहेत. पण घरी उपलब्ध होतील अशा साधनांद्वारे कमी खर्चात ऑक्सिजनची निर्मिती करता आली पाहिजे.’ असे प्रा. प्रदीप सांगतात.
प्रा. प्रदीप आणि त्यांच्या टीमने ऑक्सिजन किट बनविण्यासाठी 25 लिटरचा प्लॅस्टिकचा डबा, तांब्याच्या वायर्स, कारची बॅटरी, स्टीलचे नटबोल्ट आणि ऑक्सिजन साठवण्यासाठी फुटबॉलमधील टय़ूब, मास्क आणि ऑक्सिजन पुरवण्यासाठी आवश्यक टय़ूब या साहित्याचा वापर केला. ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी आवश्यक द्रवरूप इलेक्ट्रोलायसिस म्हणून त्यांनी सोडियम हायड्रॉक्साईडचा समावेश असलेल्या ड्रेन क्लीनरचा वापर केला.
लवकरच इंटरनेटवर उपलब्ध
हा प्रयोग घरीच करता येऊ शकत असला तरी ऑक्सिजन निर्मितीवेळी निर्माण होणाऱया हायड्रोजनच्या विल्हेवाटीची विशेष काळजी घ्यावी लागेल, असे प्रा. प्रदीप सांगतात. हा हायड्रोजन टय़ूबद्वारे घराबाहेर उंचावर सोडावा लागेल. आपल्या प्रयोगाचा व्हिडीओ प्रा. प्रदीप यांची टीम लवकरच इंटरनेटवर उपलब्ध करून देणार आहे. विज्ञानाचे ज्ञान असलेली व्यक्ती त्या प्रयोगाद्वारे ऑक्सिजन निर्मिती करू शकणार आहे.



























































