
राज्यातील आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीत अखेर 30 वर्षांनंतर सत्तांतर झाले. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू शेतकरी आघाडी’ने निर्विवाद वर्चस्व राखत सत्ताधारी आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेव महाडिक यांच्या ‘राजर्षी शाहू आघाडी’चा 17 विरुद्ध 4 असा धुव्वा उडविला.
कोरोनाच्या दुसऱया लाटेतही राज्यात चर्चेत राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी रविवारी विक्रमी 99.78 टक्के मतदान झाले होते. वार्षिक दोन हजार कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या आणि सोयी-सुविधांमुळे ‘एक वेळ आमदारकी नको; पण ‘गोकुळ’चे संचालक करा’ असा नावलौकिक झाल्याने दोन्ही आघाडय़ांकडून आजी-माजी अध्यक्ष, आमदारांसह मुलगा, पत्नी, आई अशा नातलगांतच उमेदवारी देण्यात आली होती. जिह्यातील प्रमुख राजकीय मंडळींच्या घरातच उमेदवारी दिल्याने कोण बाजी मारणार याकडे जिह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
मागास प्रवर्गात विरोधी आघाडीचे अमरसिंह पाटील (436), मागासवर्गीय प्रवर्गात माजी आमदार सुजित मिणचेकर (346), तर भटक्या-विमुक्त जाती-जमाती गटात बयाजी शेळके (239) हे विजयी झाले. पहिल्या फेरीपासून पिछाडीवर राहिलेल्या महादेव महाडिक यांच्या स्नुषा व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक या अखेरच्या फेरीत अवघ्या 46 मतांनी विजयी झाल्या. या गटात खासदार संजय मंडलिक यांच्या भगिनी व चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी सुश्मिता पाटील यांचा पराभव झाला.
विजयी उमेदवारच निघाला पॉझिटिव्ह!
‘राजर्षी शाहू शेतकरी पॅनेल’चे विजयी उमेदवार बयाजी शेळके मतमोजणीच्या ठिकाणाहून विजयी होऊन प्रसारमाध्यमांच्या गराडय़ातून बाहेर पडले. मात्र, अवघ्या शंभर मीटर अंतरावर गेल्यावर त्यांना कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचा फोन आला. ही बातमी समजताच मतमोजणीच्या ठिकाणी एकच खळबळ उडाली. विजयी उमेदवारच कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.





























































