बाबा, घरी या; तुमची आठवण येते!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरची जादू यंदाच्या आयपीएलमध्ये फारशी चालली नाही. खराब कामगिरीमुळे त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले आणि त्यानंतर त्याला अंतिम अकरामध्येही संधी मिळाली नाही. हे सर्व असूनही डेव्हिड वॉर्नरने राजस्थानच्या विरुद्ध सामन्यात 12वा खेळाडू म्हणून काम केले. त्यातच कोरोनाच्या उद्रेकामुळे बीसीसीआयने आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित केला. या निर्णयानंतर वॉर्नरच्या मुलींनी आपल्या बाबांसाठी एक चित्र पाठवत खास संदेश दिला आहे.

डेव्हिड वॉर्नरने हे चित्र इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. ‘बाबा, तुम्ही घरी या. आम्हाला तुमची खूप आठवण येते आणि आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुमच्या मुली आयव्ही, इंडी आणि इस्ला’, असे या चित्रात म्हटले आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि हिंदुस्थानी क्रिकेट बोर्डानेही एक प्रसिद्धिपत्रात म्हटले आहे, की खेळाडू त्यांच्या घरी जाऊ शकतात. त्यांची व्यवस्था केली जाईल.

डेव्हिड वॉर्नरसाठी आयपीएलचा यंदाचा हंगाम चांगला ठरला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली हैदराबादने 6 पैकी 5 लढती गमावल्या. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतले होते. त्याच्या जागी केन विल्यमसनला संघाचे कर्णधारपद देण्यात आले. विल्यमसनच्या नेतृत्वातही हैदराबादला पराभवाचा धक्का बसला.