टोकियो ऑलिम्पिक रद्द होणार? जपानमधील चार शहरांमधील आणीबाणी वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची पहिली लाट गेल्या वर्षी जगभरात आली. त्यामुळे टोकियो येथे आयोजित करण्यात येणारे ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलण्यात आले. आता या वर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत हे ऑलिम्पिक आयोजित करण्यात येणार आहे. पण कोरोनाच्या आणखी एक लाटेमुळे जपानमधील काही शहरांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. या आणीबाणीचा कालावधी आणखी वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर टोकियो ऑलिम्पिक रद्द होण्याची शक्यता या वेळी निर्माण झाली आहे.

जपानमधील टोकियो, ओसाका, क्योतो व ह्योगो या चार शहरांमध्ये सध्या 11 मे या कालावधीपर्यंत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. अद्याप जपानमधील कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. जपानचे पंतप्रधान योशीहिडे सुगा यांची सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांशी याबाबत बैठक होणार आहे. यात आणीबाणी वाढवण्यात येण्याबाबत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. ही आणीबाणी तीन आठवडय़ांपासून एक महिन्यापर्यंत असू शकते.

सर्व्हेमधून विरोध, आयोजक मात्र ठाम

कोरोनाचा इफेक्ट टोकियो ऑलिम्पिकवर होताना दिसत आहे. आता हे ऑलिम्पिक आणखी एक वर्ष पुढे ढकलता येणार नाही. टोकियो ऑलिम्पिकची तारीख पुढे ढकलण्यात येऊ शकते. जपानमधील सर्व्हेनुसार तेथील जनता ऑलिम्पिक आयोजनाच्या विरोधात आहे. पण आयोजकांनी अजून माघार घेतलेली नाही. मात्र कोरोनामुळे जगातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱया या क्रीडा महोत्सवाचे भवितव्य सध्या तरी अंधारातच दिसत आहे.