
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल आहेच. शिवाय आता राज्यातील 28 लाख 66 हजार 631 नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्यात कामीही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. आजपर्यंत लसीकरण मोहिमेत एकूण 1 कोटी 67 लाख 81 हजार 719 डोस देण्यात आले आहेत.
महाराष्ट्राने लसीकरणात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर लस वाया जाण्याचे महाराष्ट्राचे प्रमाण केवळ एक टक्के आहे. लसीचा योग्य वापर करणाऱया आरोग्य कर्मचाऱयांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वेळोवेळी अभिनंदनही केले आहे. दरम्यान, 5 मे रोजी महाराष्ट्रात 1586 लसीकरण केंद्रांद्वारे एकूण 2 लाख 59 हजार 685 नागरिकांना लसीकरण करण्यात आले. त्यामध्ये 18 ते 44 वयोगटातील 1 लाख 53 हजार 967 नागरिकांचा समावेश आहे.
देशभरात सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेत सर्वाधिक नागरिकांना दोन्ही डोस देणाऱया राज्यांमध्ये महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. या मोहिमेत राज्याने आजपर्यंत 1 कोटी 67 लाख 81 हजार 719 डोस नागरिकांना दिले आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थान (1 कोटी 35 लाख 97 हजार), गुजरात (1 कोटी 32 लाख 31 हजार), पश्चिम बंगाल (1 कोटी 14 लाख 75 हजार), कर्नाटक (1 कोटी 1 लाख 11 हजार) इतके लसीकरण झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.
- 1 कोटी 39 लाख 15 हजार 88 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
- 28 लाख 66 हजार 631 नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

































































