
मुंबईला ऑक्सिजन पुरवण्यासाठी आता भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रातील (बीएआरसी) शास्त्रज्ञांनी तयारी दर्शवली आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी यासंदर्भात केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बीएआरसीने मुंबईला ऑक्सिजन पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्लाण्टमधून पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 50 लिटरचे सुमारे 10 सिलिंडर उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा सामना करणाऱया मुंबई व महाराष्ट्राला ऑक्सिजन तुटवडय़ाची समस्या भेडसावत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजन तुटवडय़ाच्या समस्येबाबत 13 एप्रिल रोजी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आपण विविध संस्थांकडे पाठपुरावा केला. त्यास बीएआरसी, आरसीएफ, बीपीसीएल यांनी प्रतिसाद दिल्याबद्दल आपण त्यांचे आभार मानत असून यामुळे ऑक्सिजनची टंचाई दूर होण्यास मदत होईल, असे खासदार राहुल शेवाळे यांनी यावेळी सांगितले.
- बीएआरसीने आधुनिक मास्कही तयार केले आहेत. हे मास्क ‘एन 95’ पेक्षाही जास्त सुरक्षित आहेत. तसेच बीएआरसीने रिमोट बॉडी टेंपरेचर मशीनही विकसित केले आहे.
























































