प्राणवायूच्या जलद वाहतुकीसाठी ‘जीपीएस’ यंत्रणेची मदत होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱया लाटेने महाराष्ट्रात ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे. रेल्वेने एकीकडे रो रो सेवेद्वारे ऑक्सिजन एक्प्रेस चालविण्यास प्रारंभ केला असताना आात रस्ते मार्गानेही टँकर ट्रकद्वारे ऑक्सिजनची वाहतूक होत आहे. या टँकरचे नेमके स्थान कळावे आणि त्यानुसार नियोजन करता यावे यासाठी या ट्रक टँकरना जीपीएस डिव्हाईस बसविण्यासाठी दहा लाखांचा निधी राज्य परिवहन विभागाला देण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (एफएडीए)घेतला आहे.

एफएडीएचे महाराष्ट्र राज्य प्रमुख अमर जतीन शेठ यांनी राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ऑक्सिजन टँकरना ‘जीपीएस डिव्हाईस’ बसविण्याची योजना सादर केली आहे. या योजनेत 250 ऑक्सिजन टँकरना ‘जीपीएस डिव्हाईस’ बसवून त्यांचे नियंत्रण परिवहन आयुक्त कार्यालयातून करण्यासाठी एक ‘डॅश बोर्ड’ तयार करण्यासाठी दहा लाखांचा निधी पुरवला आहे. त्यामुळे एका डॅश बोर्डवर राज्यातील रस्ते मार्गाने होणाऱया ऑक्सिजन टँकरच्या वाहतुकीवर दिवसाचे 24 तास परिवहन आयुक्त कार्यालयातून नियंत्रण ठेवता येऊन त्यांची नेमकी स्थिती कळण्यास मदत होणार आहे.

एका सिंगल डॅश बोर्डवरून टँकर वाहतुकीचे नियंत्रण

250 ऑक्सिजन टँकरना ‘जीपीएस डिव्हाईस’ बसविण्यासाठी लागणारा दहा लाखांचा निधी एफएडीएच्या महाराष्ट्र शाखेने उभारला असून आठवडाभरात जीपीएस डिव्हाईस असलेले हे ऑक्सिजन टँकर रस्त्यावर धावण्यास सज्ज होतील असे संघटनेने म्हटले आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेशी झुंजणाऱया महाराष्ट्र सरकारला मदत करण्यासाठीचे हे छोटेस पाऊल असल्याचे एफएडीए यांनी म्हटले आहे. त्यामुळे एका सिंगल डॅश बोर्डवरून ऑक्सिजनच्या टँकरची वाहतूक नियंत्रण करणे शक्य होणार असल्याचे अध्यक्ष विन्केश गुलाटी यांनी म्हटले आहे.