यंदा मान्सून वेळेवर! 10 जूनपर्यंत तळकोकणात दाखल होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीच्या संकटात बळीराजा आणि देशवासीयांसाठी काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन होणार असून, 1 जूनला केरळात धडकेल. 10 जूनपर्यंत तळकोकणात आणि 15 ते 20 जूनदरम्यान महाराष्ट्रभर मान्सूनच्या आनंदघन धारा बरसतील, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. यंदा सरासरीच्या ९८ टक्के म्हणजे समाधानकारक पाऊस पडेल, असाही अंदाज व्यक्त केला आहे.

केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी ही माहिती दिली आहे. हिंदुस्थानच्या हवामान खात्याने (आयएमडी) यापूर्वी १६ एप्रिल रोजी पहिला अंदाज व्यक्त केला होता. सरासरीच्या 98 टक्के म्हणजे समाधानकारक मान्सून बरसेल, असे म्हटले होते. आज दुसरा अंदाज व्यक्त करताना ही लाँग पीरियड अॅव्हरेज (एलपीए) जून ते सप्टेंबर या दीर्घकाळात सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडेल, असे म्हटले आहे.

असा येईल पाऊस

  • देशात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मान्सूनचे आगमन सर्वप्रथम केरळमध्ये 1 जून रोजी होते. याहीवर्षी १ जूनला केरळमध्ये मान्सून येईल.
  • महाराष्ट्रासाठी समाधानाची बाब म्हणजे तळकोकणात 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापेल, असा अंदाज आहे.
  • गेल्या वर्षीही महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला होता. यावर्षीही शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
  • यानंतर 15 मे आणि मे अखेरीस हवामान विभागाकडून अंतिम अंदाज जाहीर केला जाईल.