
अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू ठेवण्यास परवानगी असताना त्यानंतरही दुकाने व व्यवसाय सुरू असतील तर ते बंद करावेत. तसेच नागरिकांचीही बाजारात गर्दी होऊ नये. यासाठी मालवण पालिकेकडून सायरन वाजवून व स्पिकरद्वारे अनोख्या पद्धतीने जनजागृती व आवाहन करण्यात येत आहे.
मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे पथक बाजरापेठ मार्गावर फिरून जनजागृती करत आहे. नगरपालिकेची टीम आली, घरी जाण्याची वेळ झाली, असे नागरिकांना सांगण्यात येत आहे. पालिकेच्या या आवाहनाला व्यापारी वर्गातूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तसेच सकाळी 11 वाजेनंतर नागरिकांचीही गर्दी कमी झाल्याचे दिसत आले. तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व होमगार्ड पथक बाजारपेठमार्गे गस्त घालून शहरात कोरोना प्रतिबंधक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत आहे. नियम मोडणाऱ्यांवर पोलीस व पालिका पथकाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईही केली जात आहे.































































