
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऑक्सिजन आणि औषधांचा पुरवठा योग्य रितीने होत नाही. देशातील या अभूतपूर्व परिस्थितीची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. सर्वोच्च न्यायालय या परिस्थितीबद्दल केंद्र सरकारला सतत फटकारत आहे. राज्यांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश न्यायालयाने केंद्राला दिले आहेत. आता ऑक्सिजन आणि औषध पुरवठय़ासाठी न्यायालयानेच 12 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. त्यात मुंबईतील डॉ. राहुल पंडित आणि डॉ. झरीर उद्वाडिया यांचा समावेश आहे.
देशात ऑक्सिजन आणि औषध पुरवठा कसा करायचा याचे अधिकार या टास्क फोर्सकडे असणार आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विभागाशी टास्क फोर्स चर्चा करून निर्णय घेईल. टास्क फोर्सला नियमावली बनवण्याचे स्वातंत्र्यही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. कर्नाटक राज्याला रोज 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठय़ाबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला 5 मे रोजी आदेश दिला होता. त्या आदेशाला केंद्राने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, मात्र सर्वोच्च न्यायालयाने केंद्राची आव्हान याचिका फेटाळून लावली.
टास्क फोर्समध्ये यांचा समावेश आहे…
पश्चिम बंगाल आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भवतोष विश्वास
दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. देवेंद्रसिंह राणा
बंगळुरूच्या नारायण हेल्थकेअरचे अध्यक्ष डॉ. देवीप्रसाद शेट्टी
तामीळनाडूच्या ख्रिश्चियन मेडिकल कॉलेजचे प्रा. डॉ. गगनदीप कांग आणि संचालक डॉ. जेवी पीटर
गुरूग्रामच्या मेदांता रुग्णालयाचे डॉ. नरेश त्रेहन
मुंबईच्या पहर्टिस रुग्णालयातील आयसीयू विभागाचे संचालक डॉ. राहुल पंडित
दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयाच्या गॅस्ट्रोएण्ट्रोलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ. सौमित्र रावत
दिल्लीच्या इन्स्टिटय़ूट ऑफ लिव्हर अॅण्ड बिलीरी सायन्सचे डॉ. शिव कुमार सरीन
मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयाचे श्वसनविकारतज्ञ डॉ. झरीर उद्वाडिया
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव




























































