
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शिरोळ तालुक्यात सोमवारपासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे.
कोरोना संसर्गाची साखळी तोडायची असेल तर काय करावे लागेल, याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज शिरोळ येथील तहसीलदार कार्यालयामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तिन्ही शहरांचे नगराध्यक्ष, नगरसेवक, तालुक्यातील सरपंच, महसूल विभाग, पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाकडील अधिकाऱयांशी संवाद साधला. जवळपास दोन तास सुरू असलेल्या या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बहुतांश जणांनी कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा आग्रह धरला. अधिकाऱयांकडूनही अशीच भूमिका मांडली गेली. यानंतर सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यात सोमवार (दि. 10) पासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
दहा दिवसांच्या या काळात सकाळी सात ते साडेआठ वाजेपर्यंत केवळ दूध विक्री व किराणा विक्री सुरू राहील. याशिवाय भाजीपाला फिरून विकण्यास याकाळात मुभा राहील. याखेरीज इतर सर्व प्रकारचे व्यापार, उद्योग व व्यवसाय बंद राहतील, असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले.
यावेळी रुग्णसंख्या, त्यांच्यावर सुरू असलेले उपचार आणि आरोग्य विभाग, महसूल विभागाकडील अडचणींबाबत राज्यमंत्री यड्रावकर यांनी आढावा घेतला.
यावेळी प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दातार यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हुपरी शहरात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू
शहरात गेल्या चार दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सोमवार (दि. 10) ते गुरुवार (दि. 20) पर्यंत जनता कर्फ्यू पुकारण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्षा जयश्री गाट यांनी दिली आहे. हुपरी नगरपरिषद कार्यक्षेत्रात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असून, हुपरी शहर अद्यापि हॉटस्पॉट आहे. त्यामुळे नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्षा जयश्री गाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

































































