
मुंबईत वेगाने लसीकरण करण्यासाठी पालिका कोरोना लसींच्या 50 लाख डोससाठी दोन दिवसांत ग्लोबल टेंडर काढणार आहे. यामध्ये फायझर, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन, स्पुटनिक आणि मॉडर्ना अशा कंपनीकडून डोस मिळणार आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली. यामुळे येत्या काही दिवसांतच मुंबईत लसीकरण वाढणार आहे.
मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. आतापर्यंत सुमारे 28 लाख डोस देण्यात आले आहेत. सध्या कोविशिल्ड ही सिरम कंपनीची आणि कोवॅक्सिन ही भारत बायोटेक कंपनीची लस वापरली जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुरेसे डोस मिळत नसल्याने लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे. बहुतांशी खासगी लसीकरण केंद्रे बंद आहेत. तर पालिका आणि राज्य सरकारच्या केंद्रांवर नोंदणीनंतरच डोस दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईला जास्तीत जास्त डोस मिळावेत आणि लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी गटनेत्यांच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यावेळी 50 लाख डोस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढण्यात येईल अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली. यावेळी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, ‘सपा’चे रईस शेख उपस्थित होते.
पालिकेची लस मोफतच
पालिकेने आतापर्यंत मोफतच लस दिली आहे. 18 वर्षांवरील नागरिकांनाही पालिका केंद्रांवर मोफत लस दिली जात आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी पालिका 227 ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करणार आहे. या ठिकाणीही मोफत लस दिली जाणार आहे. खासगी रुग्णालयांत लसींचे शुल्क घेतले जात आहे. त्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यातील 150 रुपये केंद्र सरकारला तर 100 रुपये संबंधित रुग्णालयाने घेतले आहेत. यात पालिकेचा कोणताही वाटा नव्हता. उलट पालिकेने नियोजित वेळेत त्यांना लस पुरवली, असेही महापौरांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यांची सूचना
मुंबईमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींची पुरेशी उपलब्धता होण्याच्या दृष्टीने या लसी जागतिक पातळीवरून खरेदी करण्याच्या अनुषंगाने शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला देण्यात आल्याची माहिती मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. शहरातील लसीकरण वेगाने आणि परिणामकारक होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत यासंदर्भात चर्चा केल्यानंतर महापालिकेला सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.



























































