पुस्तकांचं दान पावलं! प्रियांकाने 48 गावांमध्ये उभारली खुली वाचनालये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकांनी वाचत रहावे, पुस्तकांपासून दूर जाऊ नये, यासाठी प्रियांका चौधरी ही तरुणी गेल्या दोन वर्षांपासून मुक्त वाचनालय चळवळ राबवत आहे. याअंतर्गत लोकांनी दान दिलेली पुस्तके एकत्र करून प्रियांकाने राज्यभरातील 48 गावांमध्ये मुक्त वाचनालये सुरू केली आहेत. एवढेच नव्हे तर पुण्यासारख्या शहरात चौकाचौकात बुकशेल्फ आणि ऑटोरिक्षामध्ये फिरते वाचनालय या अनोख्या संकल्पनाही तिने राबवून दाखवल्या आहेत.

प्रियांका चौधरी मूळची यवतमाळ जिह्यातील उमरखेड गावची. गेल्या सात वर्षांपासून ती शिक्षणासाठी पुण्यात स्थायिक आहे. राज्यशास्त्र या विषयातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. सध्या ती पीएचडी करत आहे. प्रियांका आणि अभिषेक अवचार या दोघांनी मिळून पुण्यातून मुक्त वाचनालय मुव्हमेंट सुरू केली. आपली वाचून झालेली पुस्तके घरात ठेवण्यापेक्षा किंवा रद्दीत देण्यापेक्षा इतरांना वाचायला द्या,  पुस्तके दान करा, असे आवाहन त्यांनी लोकांना केले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. देणगी म्हणून मिळालेली बरीचशी पुस्तके आणि स्वतःजवळची अडीचशे पुस्तके यापासून त्यांनी अभियानाला सुरुवात केली. पुण्यात मुख्य रस्त्यांवरील चौकात बुकशेल्फ उभारले. त्यांना महापुरुषांची नावे दिली. या अभियानात  राज्यभरातून पुस्तके आणि बुकशेल्फ देणगी म्हणून स्वीकारली जातात. जर एखाद्या गावातून कुणी संपर्क साधला आणि वाचनालय सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली की, तिथे पुस्तके, बुकशेल्फ दिली जातात.

अनुदान नसेल तरीही…

सध्या लॉकडाऊनमध्ये बुकशेल्फ आणि फिरते वाचनालय उपक्रमाला तात्पुरता खंड पडला आहे. मात्र तरीही फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून प्रियांका आणि तिच्या टीमने 35 संवाद सत्र केली. वाचकांशी संवाद साधला. प्रियांका म्हणते, कुणाला वाचनालय, ग्रंथालय सुरू करायचे असेल तर शासकीय अनुदान नाही, म्हणून थांबू नका. पुस्तके वाचून अडगळीत टाकण्यापेक्षा तुम्ही दुसऱयाला वाचायला द्या. प्रियांका स्वतः लेखिका आहे. लवकरच तिचे स्वातंत्र्यलढय़ावर आधारित पुस्तक प्रकाशित होईल. मुंबई, पुण्यापलिकडे जाऊन ग्रामीण भागात पुस्तकांची दुकाने सुरू झाली पाहिजेत, यासाठी येत्या काळात ती प्रयत्न करणार आहे.

ऑटो रिक्षा वाचनालय

प्रियांकाने पुण्यात ऑटो रिक्षा लायब्ररी सुरू केली आहे. त्याबद्दल प्रियांका सांगते, एकदा वाचनालयात प्रशांत कांबळे नावाचे एक वाचक भेटले. तेव्हा त्यांच्यासमोर मी ऑटो रिक्षामध्ये फिरते वाचनालय सुरू करण्याची संकल्पना मांडली. वाचनप्रेमी असलेल्या प्रशांत यांनी तत्काळ होकार दिला. त्यानंतर मराठी भाषा दिनी कुसुमाग्रज फिरते वाचनलाय सुरू करण्यात आले. यात ऑटो ड्रायव्हरच्या पाठीमागे एक कापडी पॉकेट ठेवण्यात आले. या पॉकिटमध्ये विविध प्रकारची मराठी पुस्तके ठेवली. प्रवाशाला आवडलं तर ते पुस्तक त्यांच्या घरी घेऊन जाऊ शकतात. मात्र त्यासाठी अट एकच ते म्हणजे वाचलेले पुस्तक पुन्हा दुसऱया कुणाला तरी दिले पाहिजे.