
शिवडीतील मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील शौचालयाच्या टेरेसवर सौरऊर्जेच्या सहाय्याने वीजनिर्मिती करण्यात आली असून त्यातून आज अमन शांतीनगर येथील शौचालयाच्या सोलार पॅनेलचे तसेच एका स्ट्रीट लाईट पोलचे लोकार्पण करण्यात आले. अशा प्रकारे शिवडीतील 10 अंधाऱया जागा उजळणार आहेत. या वीजनिर्मितीचा लाभ गेली अनेक वर्षे अंधारातून वाटचाल करणाऱया स्थानिक महिला आणि मुलांना होणार आहे.
शिवडी पूर्व येथील प्रभाग क्रमांक 206 मधील संपूर्ण परिसर हा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हद्दीत असल्याने गेली कित्येक वर्षे दुर्लक्षित होता. तेथील स्थानिकांना तसेच विशेष करून महिलांना व लहान मुलांना सायंकाळी 6 वाजल्यानंतर अंधार असल्याने ये-जा करण्यास मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागत होते. या तक्रारीनंतर मुंबई पोर्ट ट्रस्टकडे स्ट्रीट लाइट पोलची मागणी करूनही त्यांनी परवानगी दिली नाही. मुंबई मनपाच्या अंतर्गत येणाऱया स्ट्रीट लाइट पोलचे बिल हे मुंबई पालिकेमार्फत भरले जाते. त्याच धर्तीवर मुंबई पोर्ट ट्रस्टच्या रोडवरील लाइट पोलचे बिल मुंबई पोर्ट ट्रस्टने भरणे गरजेचे आहे. परंतु पोर्ट ट्रस्ट यासाठी तयार नव्हती. त्यामुळे या विभागातील नागरिकांच्या विशेषतः महिला व लहान मुलांच्या सुरक्षेसाठी ही योजना राबवण्यात आली. यासाठी शिवसेना खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, आमदार अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक सचिन पडवळ यांनी ही योजना राबवली.




























































