विनामास्क, अंतर न पाळणाऱयांच्या मनावर दोन अंकाची व्हिक्टरी लस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला रोखण्यासाठी चाचण्या आणि लसीकरण सुरू असताना मुंबईत अजूनही काही जण मास्क, सुरक्षित अंतर पाळत नाहीत. अशा बेजबाबदार लोकांच्या मनावर मुंबईकर तरुणाने सोशल मीडियावरून दोन अंकाची व्हिक्टरी लस द्यायला सुरुवात केली आहे. ‘दोन मीटर अंतर-संसर्ग छूमंतर’, ‘दोन मास्क-संशय खल्लास’ आणि ‘दोन्ही हातांची सफाई-व्हायरसची धुलाई’ अशी मोहीम राबवली जात असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

कोरोनाविरोधातील लढय़ात राज्य सरकार आणि पालिकेला साथ देण्यासाठी विविध सामाजिक संस्था, व्यक्ती स्वत:हून पुढे येत आहेत. कुणी गरीब, गरजू, रोजगार गेलेल्यांना महिनाभराचे किराणाचे वाटप करत आहे, कुणी स्वत:ची गाडी, टॅक्सी, रिक्षा कोरोना रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी मोफत सेवा देत आहेत, कोणी मास्क, सॅनिटायझर वाटप तर कोणी रक्तदान शिबिरे आयोजित करत आहेत. प्रभादेवीतील अमोल मटकर हा कमर्शिअल आर्टिस्ट असलेला तरुण सोशल मीडियावर वेगळ्या पद्धतीने जनजागृती करत आपली सामाजिक बांधिलकी जपत आहे. दोन मास्क वापरणे, सुरक्षित अंतर पाळणे आणि हात धुणे या त्रिसूत्रीचे महत्त्व पटवून देण्याचे काम मटकर यांच्या जाहिरातींमधून लहान मुले हसतखेळत करत आहेत.
मुले जास्त संवेदनशील असतात. त्यांना कोरोनाचा धोका कळला आहे. पण मोठी माणसे अजूनही बेफिकीर आहेत. त्यामुळे घराबाहेर पडल्यानंतर मास्क वापरणे, सुरक्षित अंतर पाळणे यामुळेही कोरोनाला रोखता येते हे समजावून सांगण्यासाठी मुलांकडून मोठय़ांना संदेश देणे आवश्यक होते. कोरोनाविरोधातील मोहिमेत विजय मिळवायचा आहे. यासाठी दोन बोटांची व्हिक्टरी साईन वापरली आहे. कोरोनाविरोधात मनावर घ्यायची ही व्हिक्टरी लस आहे. – अमोल मटकर, कमर्शिअल आर्टिस्ट