
सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजय गौतम यांची जलसंपदा विभागात पुन्हा वर्णी लागल्याने जलसंपदामंत्री जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावरही ते नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र वित्तमंत्री अजित पवार यांनी या सर्व बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
या बातम्या कशा आल्या, कधी आल्या माहिती नाही. ज्याला महत्त्व द्यायला नको, त्यालाच आपण महत्त्व देतोय. त्यामुळे लोकांचे लक्ष तिकडे जाते. यामध्ये काही तथ्य नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांना जयंत पाटील नाराज असल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिले. अजित पवार म्हणाले, ‘एक मिनीट, हे माझ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या संदर्भात असेल, तर त्याचे उत्तर जयंत पाटीलच देतील.
जयंत पाटील खूप वरिष्ठ नेते आहेत. अनेक वर्षं त्यांनी राज्याचे अर्थ मंत्रालय सांभाळले. गृह मंत्रालय सांभाळले. ग्रामविकास मंत्रालय सांभाळले. आता ते जलसंपदा मंत्रालय सांभाळतात. त्यांच्या कामाची पद्धत बघितली, तर ते अतिशय शांत स्वभावाचे आणि अधिकाऱयांकडून काम करून घेणारे आहेत. उलट जरा तापट स्वभावाचा, कडक बोलणारा मीच आहे. ते तर एकदम माझ्या विरुद्ध आहेत. हा प्रशासनाचा भाग असतो. प्रशासनातील मुख्यमंत्री आणि मंत्री तसेच मुख्य सचिव आणि अधिकारी. आम्ही काही पहिल्यांदाच मंत्री झालेलो नाही, अनेक वर्षं आम्ही प्रशासन चालवले आहे,’ असे सांगत अजित पवार यांनी जयंत पाटील नाराज असल्याचे वृत्त साफ फेटाळले.































































