परीक्षण – बालकवितांनी बहरलेली आनंदाची बाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सागर पाटील

आई बाळाला भात भरवत असते, तेव्हा त्याच्या आजूबाजूला अंगणात 2-4 चिमण्या भात, तांदळाचे दाणे टिपत असतात. अचानक बाळ एखादी टाळी वाजवतं आणि चिमण्या घाबरून भुर्रकन उडून इथून तिथे बसतात. त्यावेळी बाळाच्या ओठांवर फुललेलं हसू, तो आनंद वय वाढलं की टिकून राहत नाही.

खरं तर एकदा वय वाढलं की पुन्हा लहान होणं, मुलांच्या स्तरावर जाऊन मुलांसारखा विचार करणं ही गोष्ट सहज शक्य नाहीच मुळी. त्यासाठी साधना हवी. ही साधना केल्यामुळेच की काय या बालकविता मुलांना आपल्याशा वाटतील अशा सरस उतरल्या आहेत. याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संग्रहातील चित्रे. या बालकविता जितक्या सरस आहेत, तितकीच सरस या संग्रहातील चित्रे आहेत. कवितेचा आशय ही चित्रे अगदी नेमकेपणाने व्यक्त करतात.

बालपण म्हणजे आनंदाची अक्षय खाण. या आनंदाचा श्रीमंतीशी, भौतिक सुखाशी काडीमात्रही संबंध नसतो. त्यामुळेच ‘बालपण दे गा देवा’ असे म्हणतात. पण पालकांनी लादलेल्या ‘अभ्यास, परीक्षा, गुणांची (मार्कांची) चढाओढ, स्पर्धा’ यामुळे आपले बालपण म्हणजे ‘कडू कडू दवा’ झालेय, असे जेव्हा ‘चमचमते तारे’मधले मूल म्हणते, तेव्हा आपण खडबडून जागे होतो.

‘सखाराम’सारखा अभ्यासापेक्षा चित्रकलेत रमणारा मित्र इथे आपल्याला भेटतो. सशाच्या ‘बर्थ डे’ला जणू काही आपणही हजर आहोत, आपल्या डोळ्यांसमोरच ही सारी लगबग चाललीय, असा भास होतो.

बुलबुल म्हणे पाहिला का
तुरा माझा छान
पहिल्या रांगेत बसण्याचा
माझाच असे मान

असा बालसुलभ हट्टीपणा ‘कावळे गुरुजींच्या शाळेत’ आपल्याला पाहायला मिळतो. इथल्या मुलांच्या स्वप्नातही पुस्तक येतं आणि ते त्याला साऱया जगाची सफर घडवतं. कधी मन लावून अभ्यास करण्याची प्रेरणा देतं. तर कधी पुस्तकाला खरा मित्र म्हणणारी मुलंही इथं पहायला मिळतात.

आजी-आजोबांना ऐकायला कमी येतं. त्यामुळे घरात होणाऱया गमती जमती सुखाची खाणमध्ये वाचायला मिळतात. पावसाला सुरुवात झाल्यावर सृष्टीमध्ये चाललेली लगबग आणि ‘बी’ला अंकुर फुटून तिच्यात होणारा बदल ‘वारा गाई गाणं’ मध्ये टिपलेला आहे. मोगऱयाची, गुलाबाची ताईशी चांगलीच गट्टी जमलेली पाहायला मिळते. मांसाहारी विरुद्ध शाकाहारी प्राण्यांची क्रिकेट मॅच जणू काही आपण प्रत्यक्ष पाहत आहोत असं वाटतं. अलीकडे विस्मरणात गेलेला विटीदांडूचा खेळ ‘इंद्रधनुष्य’ कवितेत पाहायला मिळतो. आजकाल बालविश्वातून ‘चिऊताई’च हरवत चाललीय. याची खंत असणारा मुलगा चिऊताई म्हणजे ‘आनंदाची खाण’ आहे असं म्हणतानाच

कसला साधताय संवाद
उभारुन उंच टॉवर?
शोषून घेतात ते पक्ष्यांच्या
जगण्याचीच पॉवर

हे वास्तवही आपल्यासमोर मांडतो
जत्रेमध्ये मुलांना खूपच मजा येते. म्हणूनच ‘रोजच जत्रा असायला हवी’ असं म्हणणारा मुलगा ‘जत्रा’ कवितेत भेटतो.

स्वयंपाकघर म्हणजे
आईची प्रयोगशाळा
आणि या प्रयोगशाळेत रमणारी आई ‘आनंदाचे धाम’ या कवितेत भेटते.
या ना आरोग्य राखायला
मजा खेडय़ाची चाखायला

असे म्हणत कवी खेडय़ाचं महत्त्व अधोरेखित करतो. कविता वाचताना गांधीजींच्या ‘खेडय़ाकडे चला’ या संदेशाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ‘सुखाची खाण, कुटुंब आमचे छान, आनंदाचे धाम, आमचा टीव्ही’ या कवितांमधून घरातील सारी मंडळी गमतीजमती व आवडीनिवडीसह आपल्यासमोर येतात.

‘ढगातली म्हातारी, बदलेल जिणे, चिमणीची बाळे’ अशा काही षडाक्षरी कवितादेखील या संग्रहात सजलेल्या आहेत.

‘सशाचा बर्थडे, कावळे गुरुजींची शाळा, प्राण्यांची मॅच, थेटरात गेला ससा, निसर्गदेवीची बाग, आनंदाचा मेवा, खेडय़ातली मजा, आनंदाची बाग, वनराजाची सभा’ यांसारख्या कवितांमधून प्राणी, पक्षी, फळे, फुले त्यांच्या गुणवैशिष्टय़ांसह आपल्यासमोर येतात. कवीचे अचूक निरीक्षण आणि निसर्गप्रेम या कवितांमधून जागोजागी पाहायला मिळते.

एकंदरीत या बालकवितांची चव बालकांच्या ओठांवर रेंगाळत राहील हे निःसंशय!

वारा गाई गाणे
कवी – सदानंद पुंडपाळ
प्रकाशक – इसाप प्रकाशन
पृष्ठ – 48, मूल्य – रुपये 75/-