
देशाच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावणारे सैनिक कोरोनाचे संकट उद्भवल्याने नागरिकांच्या मदतीला धावून आले आहेत. मराठा बटालियनने कश्मीरमध्ये स्थानिकांसाठी कोविड सेंटर उभारण्याचा, तसेच रोजगार नसलेल्यांना अन्नधान्य देण्याचा निर्धार केला असून, या कार्यात नाशिकचे सोशल नेटवर्कींग फोरम सहभागी झाले आहे. कश्मीरसाठी खाद्यतेल, वैद्यकीय मदत घेवून ट्रक रवाना झाल्याची माहिती अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी दिली.
कोरोना विषाणूचे थैमान वाढले तसे जगभर संकटांची मालिकाच सुरू झाली. या परिस्थितीत हजारो किलोमीटर लांब असलेले बांधव एकमेकांच्या मदतीसाठी पुढे आले. त्याचाच प्रत्यय कश्मीरी बांधवांनाही आला. नाशिकच्या सोशल नेटवर्कींग फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांना कश्मीरला पोस्टींग असलेले मित्र कर्नल प्रणय पवार यांचा मेसेज आला. या बटालियनने स्थानिकांसाठी मदतकार्य सुरू केले आहे. त्याअंतर्गत लोकसहभागातून कोविड सेंटर साकारणार असून, गरजूंना अन्नधान्य देण्यात येणार आहे. कर्नल पवार यांनी या कार्यासाठी सोशल नेटवर्कींग फोरमला आवाहन करत आवश्यक वस्तूंची यादीही पाठवली.
शूर जवान देशरक्षणासोबतच तिथल्या स्थानिक लोकांचीही काळजी घेत आहेत, अशावेळी फोरमनेही खारीचा वाटा उचलला पाहिजे म्हणून ही टिम लगेचच कामाला लागली. परदेशातील एसएनएफ सदस्यांनी आधीच कोविड मदतकार्यासाठी निधी उभारला होता. अमेरिकेहून चंद्रशेखर महाले, योगेश कासट, मस्कतहून राजेश बक्षी, विजय दुबे, दुबईहून निलेश चांडक, अबुधाबीहून माधव पाटणकर आणि आयर्लंडवरून शिरीष इंगवले यांच्या देणग्या जमा होत्या. यातून कश्मीरच्या कोविड सेंटरसाठी साठ इंन्केब्यूटर्स मशीन्स त्वरित घेण्यात आले. रचना ट्रस्टचे डॉ. हेमंत कोतवाल, डॉ. आर्चीस नेरलीकर, नरेंद्र बर्वे आणि पदाधिकाऱ्यांनीही एक हजार किलो तेलाचे पॅकेट्स देण्याची तयारी दर्शवली. पुण्यातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रमुख सुधीर मेहता यांनी एमसीसीच्या वतीने दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि इतर वैद्यकीय साहित्य दिले. वाहतुकीचा प्रश्न पुण्यातील संतोष कोडक यांनी सोडवला. कामानिमित्त महाराष्ट्रात आलेला तिकडचा एक ट्रक शोधून त्यांनी सर्व साहित्य भरून ट्रक नाशिकहून कश्मीरला रवाना केला.
तीन मित्रांचा पुढाकार
विशेष म्हणजे प्रमोद गायकवाड, कर्नल प्रणय पवार आणि संतोष कोडक हे तिघेही संभाजीनगरच्या सर्विसेस प्रिपेरेटरी इन्स्टिट्यूटचे माजी विद्यार्थी आहेत. सोशल मीडियावर एकत्र येत परदेशातील बांधवांच्या मदतीने त्यांनी नाशिक, पुणे ते कश्मीरी बांधवांपर्यंत मदतकार्याची ही एक शृंखला पूर्ण केली.





























































