
कोरोनाने थैमान घातले असताना सक्रिय रुग्णांना मोठय़ा प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासू लागली. ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी बुलढाण्यातील स्त्री रुग्णालय समर्पित जिल्हा कोविड रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱया प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे.
पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्घाटनाची औपचारिकता रद्द करत फक्त पाहणी करून सदर प्रकल्प कार्यान्वित झाला असल्याची घोषणा केली. या प्रकल्पाद्वारे 80 जम्बो सिलिंडर हवेतील ऑक्सिजन 24 तासांत उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे सिलिंडरचा वापर न करता थेट प्लांटपासून रुग्णांच्या बेडला ऑक्सिजन पाइपलाइन अटॅच करून रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यात येणार आहे. देऊळगावराजा, खामगाव, मलकापूर व इतरही ठिकाणी प्राणवायू निर्मिती प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली.
कोरोनाच्या गंभीर संकटात रुग्णांना मोठय़ा प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. बुलढाणा जिह्याला दररोज जवळपास 16 मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेऊन हवेतून प्राणवायू निर्मिती करण्याची सुरुवात करण्यात आली आहे. पुढील काळात जिह्याला प्राणवायू निर्मितीत स्वयंपूर्ण करण्यात येईल, असा विश्वास शिंगणे यांनी व्यक्त केला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, डॉ. वासेकर आदी यावेळी उपस्थित होते.



























































