
सोलापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाही सामाजिक कार्यकर्ते करण मेहेत्रे यांच्या अंत्ययात्रेला हजारो समर्थकांनी गर्दी केल्याचे समोर आले आहे. या अंत्ययात्रेत कोरोनाचे सर्व नियम अक्षरशः धाब्यावर बसविण्यात आल्याचे दिसून आले.
सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते करण मेहेत्रे (40) यांचे नुकतेच खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या आठवडय़ापासून ते या रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, त्यानंतर उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने अखेर शनिवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच हजारो समर्थकांनी रुग्णालयासमोर गर्दी केली होती.
रविवारी सकाळी सोलापूर शहरातील लष्कर विभागातून करण यांची अंत्ययात्रा निघाली. तत्पूर्वी अंत्ययात्रेबाबत सोशल मीडिया तसेच स्थानिक वृत्तपत्रातून जाहिराती देण्यात आल्या होत्या. लष्कर विभागात डिजिटल फलक लावण्यात आले होते. त्यामुळे करण मेहेत्रे यांच्या हजारो समर्थकांनी अंत्ययात्रेला मोठी गर्दी केली. लष्कर-जगदंबा चौक-सात रस्तामार्गे अंत्ययात्रा मोदी स्मशानभूमीत आली. येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळीही त्यांचे हजारो समर्थक उपस्थित होते.




























































